विमाने, रेल्वेगाड्या रद्दमुळे प्रवाशांचे हाल | पुढारी

विमाने, रेल्वेगाड्या रद्दमुळे प्रवाशांचे हाल

पुणे : दक्षिण भारतात आलेल्या मिचौंग वादळामुळे पुण्यातून दक्षिणेकडे होणारी विमानसेवा सोमवारी कोलमडली. पुण्यातून दक्षिणेकडे जाणारी सहा आणि पुण्यात येणारी सहा विमानोड्डाणे रद्द करण्यात आली. परिणामी, विमान प्रवाशांचे सोमवारी हाल झाले. तसेच चेन्नईला जाणार्‍या रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवासाचे बुकिंग करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कित्येक तास प्रवाशांना विमानतळावर आणि रेल्वे स्टेशनवर थांबून राहिल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. ज्येष्ठ आणि महिलांनी याबाबत संताप व्यक्त केला.

दक्षिणेकडे जाणारी बारा विमाने जागेवरच

खराब हवामानामुळे वेळांमध्ये बदल

पुणे विमानतळावरून दररोज 180 ते 190 च्या घरात विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे 25 ते 30 हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानाचा विमानसेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात मुख्यत्वे करून दिल्लीतील धुक्यामुळे, प्रदूषणामुळे पुण्याहून दिल्लीकडे जाणार्‍या विमानांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल होत असून, प्रवाशांना तासन् तास विमानतळावर बसावे लागत आहे. त्यातच आता चेन्नईत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे पुण्यातून चेन्नईसह दक्षिण भागात इतर ठिकाणी जाणारी विमाने आणि तेथून पुण्यात येणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोमवारी मनस्ताप सहन करावा लागला.

पुण्यातून रद्द झालेली उड्डाणे

विमानोड्डाणे संख्या

  • पुणे-मंगळूरू 1
  • पुणे-हैदराबाद 1
  • पुणे-चेन्नई 2
  • पुणे-बंगळुरू 1
  • पुणे-नागपूर 1

पुण्यात येणारी रद्द उड्डाणे

विमानोड्डाणे संख्या

  • चेन्नई-पुणे 03
  • मंगळुरू-पुणे 01
  • हैदराबाद-पुणे 01
  • नागपूर-पुणे 01
  • रद्द विमानोड्डाणे 12

मिचाँग चक्रीवादळाचा रेल्वे सेवेवर परिणाम

मिचाँग चक्रीवादळामुळे मुंबई-चेन्नई सेंट्रल-मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे अगोदरच तिकिटाचे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. बाहेरगावी प्रवास करायचा म्हटलं तर प्रवाशांची गर्दी आणि तिकिटाला असलेली गर्दी लक्षात घेत, अनेक प्रवासी दोन ते तीन महिने अगोदरच तिकिटाचे बुकिंग करतात. काही जण तर अधिकचे पैसे देऊन तत्काळ तिकिटाचे आरक्षण करतात. मात्र, एवढे करूनही आता मिचाँग चक्रीवादळाने रेल्वेच्या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा नियोजित प्रवासही रद्द झाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून, त्यांना नियोजित कामे होणार नसल्यामुळे मनस्ताप होत आहे.

रेल्वेच्या या गाड्या रद्द

  • रविवारी सुटणारी गाडी क्रमांक 22159 मुंबई-चेन्नई सेंट्रल, अरक्कोनम-चेन्नई सेंट्रल दरम्यान आंशिकपणे रद्द केली आहे. आणि काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.
  • सोमवारी सुटणारी गाडी क्रमांक 22160 चेन्नई सेंट्रल- मुंबई, चेन्नई सेंट्रल-अरक्कोनम अंशतः रद्द केली आहे.

मिचाँग चक्रीवादळामुळे पुण्यातून चेन्नईकडे जाणारी आणि पुण्यात येणारी 12 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त आणखी विमान उड्डाणांच्या रद्दबाबतची काही माहिती उपलब्ध नाही.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

हेही वाचा

Back to top button