Pune News : विद्यापीठात लवकरच 111 प्राध्यापकांची भरती | पुढारी

Pune News : विद्यापीठात लवकरच 111 प्राध्यापकांची भरती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 215 रिक्त पदांपैकी 111 जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठात साधारण 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. या सर्वांचा परिणाम विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून, विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कंत्राटी तत्त्वावर काही काळासाठी 133 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला 111 रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात विद्यापीठाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरही देण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या जाहिरातीही लवकरच प्रकाशित केल्या जातील, असे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सेट परीक्षेचे अर्जही सुरू होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख विद्यापीठाने जाहीर करतानाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या तारखा लवकर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

हेही वाचा

Back to top button