भाकरीचा चंद्र आवाक्यात; ज्वारीच्या दरात घसरण

भाकरीचा चंद्र आवाक्यात; ज्वारीच्या दरात घसरण

पुणे : बेसनापासून मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचं म्हंटलं की गरमागरम ज्वारीची भाकरी ही ताटात हवीच हवी. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणार्‍या ज्वारीसाठी यंदा हंगाम पोषक ठरल्यामुळे बाजारात ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी गेल्या दहा दिवसांत ज्वारीचे दर किलोमागे तब्बल 10 ते 15 रुपयांनी घसरून 38 ते 58 रुपये किलोपर्यंत आले आहेत. त्यामुळे, हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्य गृहिणींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात जामखेड, अहमदनगर, खर्डा, राशीन, सोलापूर येथून गावरान ज्वारी तर राज्यातील पाचोरासह परराज्यांतील नंदीयाल, सिंधनूर व जामनेर भागातून दुरी ज्वारी बाजारात दाखल होते. सद्य:स्थितीत बाजारात दररोज दहा टनांच्या 5 ते 6 ट्रकमधून आवक होत आहे. मागील महिन्यात हीच आवक अवघी 2 ते 4 ट्रक होती. सध्या ज्वारीचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डात आवक दुपटीने वाढली असून त्यातुलनेत मागणी कमी आहे. परिणामी, घाऊक बाजारात ज्वारीच्या दरात मागील दहा दिवसांत किलोमागे 15 ते 30 रुपयांनी घसरण झाली आहे. मागील महिन्यात 45 ते 78 रुपये किलोवर असणारे दर आता 30 ते 55 रुपयांवर आले आहेत.

चपातीपेक्षा भाकरी खाण्याला पसंती

स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह वाढता आहे. त्यामुळे शहरामध्ये ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. पुण्याइतकीच राज्यातील अन्य भागांतही ज्वारीला वाढती मागणी आहे. ज्वारीचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात मुबलक पुरवठा होत आहे. मात्र, उत्पादनात वाढ झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा परिस्थिती उलट आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाला जिवदान मिळाल्याने यंदा बंपर पीक निघण्याचा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला असल्याने ज्वारीच्या दरात आलेली स्वस्ताई टिकून राहील.
– विजय मुथा, ज्वारीचे व्यापारी

ज्वारीची वैशिष्ट्ये गावरान ज्वारी : ज्वारीचे दाणे मोठे व चमकदार असतात. या ज्वारीतून जास्त पीठ निघते. या ज्वारीच्या भाकरी या नरम असतात.
दुरी : ज्वारीचे दाणे लहान व गावरानच्या तुलनेत कमी चमकदार असतात. यामध्ये पिठाचे प्रमाण कमी राहते. भाकरी या कडक राहतात.

बाजरीचे दर स्थिर

बाजरी ही उष्ण असल्याने ती थंडी तसेच पावसाळ्यात खाण्यास प्राधान्य देण्यात येते. सद्य:स्थितीत थंडी कमी होऊन उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे, बाजरीची मागणी घटली आहे. तर, ज्वारी स्वस्त झाल्याने पुणेकरांची पावले ज्वारीच्या भाकरीकडे वळू लागली आहेत. सध्या घाऊक बाजारात राज्यासह उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान येथून बाजरीची आवक होत आहे. बाजरीच्या किलोला 32 ते 35 रुपये दर मिळत आहे. संक्रांतीनंतर बाजरीला मागणी कमी होऊन दरही खाली येत असल्याचे व्यापारी वर्गाकडून नमूद करण्यात आले.

जानेवारी व फेब्रुवारीमधील ज्वारीचे किरकोळ दर
ज्वारी प्रतिकिलो (जाने.)               प्रतिकिलो (फेब्रु)

  • गावरान : 70 ते 68 रुपये            56 ते 58 रुपये
  • गावरान नं. : 2 58 ते 64 रुपये     50 ते 48 रुपये
  • गावरान नं. 3 : 50 ते 55  रुपये    45 ते 47 रुपये
  • दुरी: 45 ते 50 रुपये                  38 ते 40 रुपये

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news