

पुणे: कोरोना साथीमुळे अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींचे कंबरडे मोडल्याने त्यांचे घराचे स्वप्न लांबले गेले होते. यंदा प्रथमच परवडणार्या घरांची विक्री वाढली आहे. याचदरम्यान बडे विकसक लक्झरी अपार्टमेंटमागे धाव घेत आहेत. त्यामुळे सध्या देशात एक कोटी परवडणार्या श्रेणीतील घरांची तूट जाणवत असल्याची माहिती अॅनारॉक या रिअल इस्टेट विश्लेषक संस्थेच्या अहवलातून समोर आली आहे.
कोविड-19 दरम्यान आणि नंतर 40 लाख रुपयांच्या आतील परवडणार्या घरांना मोठा फटका बसला. या श्रेणीतील घरे घेणार्यांच्या उत्पन्नात घट झाल्याने या श्रेणीतील घरांची मागणी घटली होती. अॅनारॉकने दिलेल्या आकडेवारीनुसार परवडणार्या श्रेणीतील घरांची विक्री 2019 मध्ये 38 टक्के होती. त्यात 2024 पर्यंत 18 टक्क्यांपर्यंत घट झाली. (Latest Pune News)
याच कालावधीत नवीन घरांचा पुरवठा 40 वरून 16 टक्क्यांपर्यंत घसरला. गेल्या वर्षी नवी दिल्ली, मुंबई, पुण्यासह सात शहरांमध्ये परवडणार्या श्रेणीतील न विकल्या गेलेल्या घरांचा साठा 19 टक्क्यांनी घटला आहे. या श्रेणीतील घरांची संख्या जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत 1 लाख 40 हजार होती. त्यात जानेवारी ते मार्च 2025 या काळात 1.13 लाख लाखापर्यंत घट झाली आहे. याचाच अर्थ परवडणार्या घरांची मागणी चांगली वाढली आहे.
भारताला परवडणार्या घरांची तीव्र टंचाई भेडसावत आहे. केवळ शहरी भागात सुमारे 1 कोटी घरांची तूट आहे. तर, 2030 पर्यंत अतिरिक्त 2.5 कोटी परवडणार्या घरांची आवश्यकता भासेल. परवडणार्या घरांना थेट मदतीची नितांत गरज असल्याचे मत अहवालात नोंदवण्यात आले आहे.
मोठ्या कंपन्यांनी अधिक फायदेशीर प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटकडे धाव घेतली आहे. त्यामुळे परवडणार्या घरांचा कणा छोटे विकासक बनले आहेत. त्यांच्यासमोर केवळ महागडे कर्ज आणि पारंपारिक वित्तपुरवठा संस्थांचा पर्याय आहे. परिणामी या श्रेणीतील घरांची उभारणी संकटात सापडल्याचे अहवालातून सूचित करण्यात आले आहे.
प्रीमियम घरांच्या विक्रीत घट
लक्झरी आणि प्रीमियम घरांमध्ये वाढ झाली असली तरी, गगनाला भिडणार्या किमती आणि महागड्या गृहकर्जामुळे पहिल्यांदाच घर खरेदी करणार्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्ती स्वतःचे घर घेणे टाळत आहेत. त्यामुळे 2025 च्या पहिल्या तिमाहीत भारतातील 7 महानगरांमध्ये निवासी घरांच्या विक्रीत जानेवारी ते मार्च 2024 च्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 28 टक्क्यांनी घट झाली आहे. वाढलेल्या किमती आणि महागडे कर्ज यामागे असल्याचे अॅनारॉकचे म्हणणे आहे.