

पुणे: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांचे आज मंगळवारी (दि. 10) पुण्यात वर्धापन दिनाचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. त्यामुळे या मेळाव्यांमध्ये पुन्हा मनोमिलनावर चर्चा होणार की आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्याचे आदेश दिले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर होणारा पक्षाचा तिसरा वर्धापन दिन आहे. फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळाले. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि एकमेकांवर टोकाची टीकाही पवार कुटुंबातील सदस्यांसह नेते मंडळींनी केली. (Latest Pune News)
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर हा संघर्ष मवाळ झाल्याचे चित्र आहे. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांसह अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार एकत्र येऊन चर्चा करताना दिसतात. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदारांनी अजित पवारांसमवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.
त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर दोन्ही पवारांकडून वेगवेगळी विधाने करून राजकीय गुगली टाकण्याचे काम सुरू आहे.
पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाला त्यावर काही ठोस पाऊल पडेल, अशी चर्चा असतानाच दोन्ही पक्षांनी पुण्यात स्वतंत्र मेळाव्यांचे आयोजन करून एकत्र येण्याच्या चर्चांना तात्पुरता विराम दिला आहे. त्यामुळे आज होणार्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत ठोस भाष्य करून आगामी दिशा स्पष्ट करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.
रणशिंग फुकले जाणार का?
आगामी चार महिन्यांत राज्यातील27 महापालिकांसह जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन एकत्र निवडणूक लढविणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यांमध्ये एकमेकांविरोधातनिवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.