पुणे: माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) संचालक मंडळाच्या बैठकीनिमित्त सोमवारी (दि. 9) एकदा एकत्र आले.
मात्र, एकत्रीकरणाची चर्चा असताना त्यांनी काकांच्या शेजारी बसणे टाळले. यामुळे कशाही क्षणात चर्चेचा बाजार भरला. तथापि, काका-पुतणे एकाच व्यासपीठावर असले तरी त्यांच्यातील दुरावा कायम असल्याचे यावरून स्पष्ष्ट झाले आहे. (Latest Pune News)
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान वापराच्या विषयावरील बैठकीत व्यासपीठावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारच्या खुर्चीत बसणे पुन्हा टाळले. दोन्ही पवार यांच्यामधील खुर्चीत काही वेळ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे बसले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार, ही होत असलेली चर्चा तसेच मंगळवारी (दि. 10) दोन्ही गटांचा स्वतंत्रपणे पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा पुण्यात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशीच्या या घटनेने राज्यातील सर्व साखर कारखानदारांचे लक्ष वेधले.
व्हीएसआयमधील ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानासाठी आयोजित बैठकीस व्यासपीठावर सुरुवातीला शरद पवार आणि अजित पवार हे काही मिनिटांसाठी शेजारी शेजारी बसले. दोघांमध्ये संवाददेखील झाला. मात्र, काही वेळानंतर अजित पवार यांच्याकडून कार्यक्रमातील या आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला.
अजित पवारांनीच केली बाबासाहेब पाटील यांची व्यवस्था
कार्यक्रमात व्यासपीठावर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील थोडेसे उशिरा उपस्थित झाले. त्यावेळी पाटील यांना दोन्ही पवारांच्यामध्ये खुर्ची टाकून बसण्याची व्यवस्था अजित पवार यांनीच केली; तर बाबासाहेब पाटील यांचे भाषण सुरू झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या खुर्चीत बसले. मागील महिन्यातील व्हीएसआयमधील एका बैठकीतही पवार यांनी व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसण्याचे टाळले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली.
प्रास्ताविक थांबवून सांमजस्य कराराची घोषणा
कार्यक्रमात सुरुवातीला व्हीएसआयचे विश्वस्त जयंत पाटील यांनी प्रास्तविक भाषण केले होते. मात्र, अजित पवार यांनी ते प्रास्तविक मध्येच थांबवून कार्यक्रमपत्रिकेनुसार व्हीएसआय आणि बारामती कृषी विज्ञान केंद्रातील एआय तंत्रज्ञानाबद्दलचा सामंजस्य करार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यास सूत्रसंचालिकेला सांगितले. तसा कार्यक्रम सुरू असताना जयंत पाटील पुन्हा खुर्चीत बसले. त्यानंतर त्यांनी प्रास्तविक पूर्ण केले.