पुणे: कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागात कडक तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी कंट्रोल रूममधून आले आहेत. त्यामुळे आम्ही पहाटे साडेचार वाजेपर्यंत तपासणी करणार आहोत. आमच्यासोबत स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारीही आहेत.
आरटीओच्या पथकाबाबत विचारले असता ते सोबत नसल्याचे या परिसरातील वाहतूक पोलिसाने सांगितले, तर पोर्शे अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे का? असा प्रश्न वाहनचालकांमध्ये चर्चिला जात होता. (Latest Pune News)
दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी (दि. 16) कोरेगाव पार्क, कल्याणीनगर भागांत बंदोबस्तावर असलेल्या काही वाहतूक पोलिसांशी संवाद साधला असता, एका कर्मचार्याने असे सांगितले की, कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
दै. ‘पुढारी’च्या पाहणीत शनिवारी (दि.17) पहाटे हे दिसून आले. कल्याणीनगर, रामवाडी आणि कोरेगाव पार्क या भागांतील रस्त्यांवर पोलिसांकडून जोरदार तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या तपासणीत मद्यपान करून वाहन चालविणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते.
यावरून स्पष्ट होते की, कल्याणीनगरमधील दुर्दैवी घटनेची वर्षपूर्ती लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर केली आहे. मद्यपान करून वाहन चालविणार्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे.
‘ब्रेथ अॅनालायझर’च्या साहाय्याने ड्रंक अँड ड्राइव्ह चाचणी
पोलिसांनी कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील प्रत्येक चौकात नाकाबंदी केली होती. वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी संयुक्तपणे वाहनांची कसून तपासणी करीत होते. या वेळी प्रत्येक वाहनचालकाची ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या साहाय्याने ड्रंक अँड ड्राइव्ह चाचणी घेण्यात येत होती. तसेच, प्रत्येक वाहनाच्या क्रमांकाची नोंदणी पोलिसांकडून केली जात होती.
पब वेळेत बंद; मात्र बाहेरची गर्दी वेळेत हटणार कधी?
दै. ‘पुढारी’च्या टीमने मध्यरात्री दोनच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील काही प्रसिद्ध पबची पाहणी केली. त्या वेळी सर्व पब वेळेत बंद झालेले दिसले. तसेच, पबच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांची गस्त देखील सुरू होती. काही तरुण पब बंद झाल्यावरही बाहेर घोळक्याने उभे असल्याचे दिसले. त्यांना गस्तीवरील पोलिसांनी घरी जाण्याची सूचना केली. पोलिसांच्या सूचनेनंतर काही जण दुचाकी व चारचाकी वाहनांनी, तर काही जण टॅक्सीने घरी रवाना झाले. कोरेगाव पार्क भागात अनेक स्पा सेंटर्सही रात्री बंद असल्याचे दिसून आले.
...म्हणून ही मोहीम?
कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर हा भाग व्हीआयपी म्हणून ओळखला जातो. येथे अनेक आयटी कंपन्या असल्याने आठवड्याच्या शेवटी तरुण पिढी मोठ्या संख्येने पबमध्ये जाते. मद्यपान करून परतताना अपघाताची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे, की येथे आठवड्याच्या प्रत्येक विकेंडला अशी कारवाई असते? असा प्रश्नही या वेळी उपस्थित झाला.
पोलिसांची ही कारवाई चांगली आहे. गेल्या वर्षीच्या घटनेनंतर आतातरी काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईत सातत्य असावे. तरच, या भागात होणार्या अपघाताच्या दुर्दैवी घटना रोखण्यास मोठा हातभार लागेल.
- कुणाल चव्हाण, वाहनचालक