पुणे : पुढारी वृत्तसेवा : कमला नेहरू रुग्णालयात प्रियांका माकम या 26 वर्षांच्या गर्भवती महिलेने सातव्या महिन्यातच जुळ्यांना जन्म दिला. लवकर प्रसूती झाल्याने बालकांचे वजन अनुक्रमे 920 आणि 980 ग्रॅम होते. अशक्त बालकांना जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले. दीड महिना त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. ठणठणीत झाल्यानंतर बालकांना घरी सोडण्यात आले.
कमी दिवसांच्या आणि कमी वजनाच्या जुळ्या बाळांना महिनाभर व्हेंटिलेटरवर आणि पंधरा दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. एका बाळाच्या फुप्फुसांमध्ये हवा जमा झाल्यामुळे (न्युमोथोरॅक्स) तीनदा नळी टाकण्यात आली. बाळाच्या तब्येतीमध्ये अनेकदा चढ-उतार होत होते. बालकांची दृष्टी कमी होण्याचाही धोका होता. डोळ्यांची तपासणी करून लहानग्यांवर लेझरचे उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांचे अंधत्व टळले.
कमला नेहरू रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी आपल्या टीमसह प्रयत्नांची शर्थ करत जुळ्या बाळांवर यशस्वी उपचार केले. दीड महिन्यांनी दोन्ही बाळांची वजने अनुक्रमे 1.6 आणि 1.9 किलोग्रॅम झाले आहे. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.
कमला नेहरू रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये 20 बेड उपलब्ध आहेत. येथे कमी दिवसाची, कमी वजनाची, कावीळ झालेली, श्वास घेण्यास त्रास होणारी, ओठ दुभंगलेली अशा बाळांवर उपचार केले जातात. अधीक्षक डॉ. सुरज वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान बाळांची काळजी घेतली जाते.
– डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ.
हेही वाचा