ब्रह्मांडाच्या पसार्यात कोट्यवधी घटना दर सेकंदाला घडत असतात. मात्र, तिथंपर्यंत पोहोचणे मानवाला शक्य नाही. मात्र, अशीच एक गूढ घटना आयुकाच्या शास्त्रज्ञांनी टिपली आहे. पृथ्वीपासून सात हजार प्रकाशवर्षे लांब असणारे कृष्णविवर त्याच्यापेक्षा मोठ्या तार्याला गिळू पाहत आहे. पुण्याच्या आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. गुलाब देवांग यांच्यासह तन्मय चतोपाध्याय (स्टॅनफोर्ड, अमेरिका) डॉ. वरुण भालेराव (आयआयटी, मुंबई) यांनी पृथ्वीपासून सात हजार प्रकाश वर्षे लांब असणार्या सिग्नस एक्स-1 या कृष्णविवराजवळ क्ष-किरणे दिसल्याचा शोध आठवडाभरापूर्वींच लावला. जगभरात प्रथम हे संशोधन या तीन भारतीय शास्त्रांनी मांडले. ही नेमकी काय घटना आहे याची माहिती डॉ. देवांग यांच्याकडून जाणून घेतली तेव्हा विश्वाच्या पसार्याविषयीचे कुतूहल अजून वाढले.