बिबवेवाडी: बिबवेवाडी आणि महर्षीनगर परिसरात अनेक ठिकाणी खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या बांधकामांना अडथळा ठरणार्या वृक्षांची तोड सध्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने या भागात नियमांपेक्षा जास्त वृक्षतोड केली जात आहे. हे काम बर्याचदा रात्रीच्या वेळी केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.(Latest Pune News)
महापालिकेत सध्या प्रशासक राज असल्याने उद्यान विभागाचे बरेच अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना दिलेले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी क्षेत्रीय कार्यालयाकडील उद्यान निरीक्षकांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वृक्षतोडीसाठी तातडीने परवानगी दिली जात आहे.
वृक्षतोड करणारे ठेकेदार, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगमताने नियमांपेक्षा जास्त वृक्षतोड होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिका नागरिकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत आहे.
मात्र, दुसरीकडे वैयक्तिक स्वार्थ आणि आर्थिक लाभासाठी नियमांना तिलांजली देऊन वृक्षतोड केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन होताना दिसून येत नाही. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमधील महर्षीनगर येथे तीन ठिकाणी अर्धवट परवानगी घेऊन मोठी झाडे नुकतीच तोडण्यात आली आहेत. या वृक्षतोडीला उद्यान विभागाच्या निरीक्षकांचे पाठबळ असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील उद्यान विभागाचे निरीक्षक, कर्मचारी वरिष्ठ अधिकार्यांना चुकीची माहिती देऊन वृक्षतोड करण्याची परवानगी बांधकाम व्यावसायिकांना देतात. मात्र प्रत्यक्षात किती झाडे तोडले, हे पाहात नाहीत. यामुळे परिसरात बांधकाम प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.
-बसवराज गायकवाड, रहिवासी, बिबवेवाडी
महर्षीनगर आणि बिबवेवाडी परिसरात परवानगी दिल्यापेक्षा जास्त वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यापुढे परवानगी दिल्यानंतर किती वृक्षतोड झाली याची समक्ष खात्री करून घेतली जाईल.
-विलास आटोळे, उद्यान निरीक्षक, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय