

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर 3,000 इच्छुकांतून पाच टक्के उमेदवार निवडण्याचे आव्हान होते, ते योग्य पद्धतीने पेलल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भाजपाने यंदा मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिल्याने महिला कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आठ वर्षांनी जाहीर झालेल्या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी राजकीय जीवनाचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले होते.
यामध्ये प्रस्थापित पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. पक्षातील स्थानामुळे या प्रस्थापितांच्या घरात उमेदवारी गेल्यास आपली संधी हुकणार, अशी चिंता भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. प्रत्यक्षात भाजपाने निवडणूक रणनीतीचा विचार करून पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही स्थान देत ‘कार्यकर्त्यांचा पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा अधिक ठळक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर पुण्यातील नागरिक खूश असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून वारंवार दिसून आले. पुणे महापालिकेत 2017 मध्ये पहिल्यांदाच संधी मिळाल्यानंतर भाजपाने लावलेला विकासकामांचा धडाका देखील पुणेकरांच्या पसंतीस पडल्याचे मत पुणेकरांनी व्यक्त केले. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस होती. विविध संघटनांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महापालिकेत काम करण्याची संधी हवी होती. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. दीर्घकाळच्या आपल्या योगदानाची दखल पक्ष घेईल, मात्र उमेदवारांचे अनेक समर्थ पर्याय असल्याने नेमका निकष काय लावला जाईल, याची चिंता प्रत्येकाला होती.
या पार्श्वभूमीवर कोअर कमिटीतील निर्णयानुसार मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याची भूमिका स्वीकारली. ‘लोकप्रतिनिधींच्या घरात उमेदवारी द्यायची नाही,’ अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. परिणामी विविध प्रभागांमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारी दिसली आहे. त्याचसोबत महापालिकेत दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या स्थानिक नेतृत्वालाही संधी दिली आहे. यामुळे अनुभवी ज्येष्ठ आणि तरुण तुर्कांचा संगम भाजपाच्या उमेदवारांत दिसतो आहे.
भाजपाने साधले संतुलन...
‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेवर निष्ठा ठेवून वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. या ‘केडर’ला योग्यवेळी संधी देऊन पक्ष नेतृत्वाने संतुलन साधले. पुणे भाजपाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दिवंगत गिरीश बापट आणि दिवंगत मुक्ता टिळक यांच्या वारसांना उमेदवारी देऊन, भाजपाने त्यांना योग्य पद्धतीने आदरांजली वाहिली. सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी देऊन स्थानिक संतुलनही साधले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.