

पुणे: देशातील यंदाचा 2025-26 मधील ऊस गाळप हंगाम आता जोमात सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामअखेरीस सर्वाधिक 110 लाख मे. टन साखर उत्पादनासह महाराष्ट्रच नंबर वनवर कायम राहील, तर 105 लाख टन उत्पादनासह उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर राहण्याचा प्राथमिक अंदाज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून वर्तविण्यात आला. त्यामुळे यंदाच्या हंगामातही सलग सर्वाधिक साखर उत्पादनात महाराष्ट्राचा डंका कायम राहण्याचीच दाट शक्यता आहे.
देशात सद्य:स्थितीत एकूण 499 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. सद्य:स्थितीत 1340 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे, तर 8.84 टक्के सरासरी साखर उताऱ्यानुसार 31 डिसेंबर 2025 अखेर सुमारे 118 लाख 30 हजार मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन हाती आल्याचे महासंघाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशात यंदाच्या हंगामात अपेक्षित अंदाजानुसार अंतिम निव्वळ साखर उत्पादन 315 लाख टनाइतके हाती येण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये इथेनॉलकडे वळवल्या जाणाऱ्या 35 लाख मे. टन साखरेव्यतिरिक्त हे साखर उत्पादन असेल. तर राज्यनिहाय अपेक्षित साखर उत्पादन लाख मे. टनात पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र 110, उत्तर प्रदेश 105, कर्नाटक 55, गुजरात 8.00, आंधप्रदेश 1.00, बिहार 6, हरियाणा 5.50, मध्य प्रदेश 5.00, पंजाब 5.50, तामिळनाडू 7.00, उत्तराखंड 4.00 आणि उर्वरित मिळून 1.50 लाख मे. टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या 2025-26 च्या हंगामात सुमारे 15 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये निर्यातीच्या कोट्यापैकी आतापर्यंत सुमारे 2 लाख 20 हजार मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले आहेत. ज्याचा सरासरी साखर कारखान्यांवरील दर (एक्स-मिल) हा क्विंटलला सुमारे 3 हजार 650 ते 3 हजार 820 रुपयांदरम्यान आहेत. भारतीय साखर सध्या अफगाणिस्तान, श्रीलंका, मध्य पूर्व देश आणि आफिकन देशांमध्ये निर्यात होत आहे. साखर महासंघाकडून आणखी 15 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. त्यापैकी किमान पाच लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी दिल्यास साखर दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली