Dr. Smita Yogesh Jadhav | पदवीधरांना उद्योगांभिमुख प्रशिक्षण : प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा केंद्रे

भाजप पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा पदवीधरांसाठी नऊ कलमी कार्यक्रम
पुणे : प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी संवाद साधताना डॉ. स्मिता योगेश जाधव.
पुणे : प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी संवाद साधताना डॉ. स्मिता योगेश जाधव.
Published on: 
Updated on: 

पुणे : पदवीधर तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स, करिअर कौन्सिलिंग, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण केंद्रे, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित वसतिगृहे आणि घरून काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासह पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी नऊ आश्वासने भारतीय जनता पक्षाच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी पुण्यात जाहीर केली.

भाजपच्या प्रचारसभेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी पदवीधरांच्या रोजगारापासून ते मानसिक आरोग्यापर्यंतच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. केवळ पदवी मिळवून रोजगार मिळत नाही, तर उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये, योग्य करिअरची दिशा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले पदवीधर, तसेच मधल्या टप्प्यात करिअर करणाऱ्या व्यक्तींनाही आपल्या नऊ आश्वासनांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. जाधव पुढे म्हणाल्या, ‘कोल्हापूर ही जन्मभूमी, तर पुणे ही कर्मभूमी आहे. पुण्यातील आपटे प्रशालेतून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी, फायनान्समधील एमबीए आणि शिक्षणशास्त्रातील पीएच.डी. पूर्ण केली. गेल्या २३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, सध्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथे प्रो-व्हाईस चान्सलर आणि सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे.’

लग्‍नानंतर ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाच्या परिवाराचा भाग झाल्याने लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या भावना सरकारपर्यंत कशा पोहोचवता येतात, याचा अनुभव गेल्या २५ वर्षांत मिळाला. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे गेल्या १९ वर्षांपासून समाजसेवेचे काम सुरू आहे. डॉ. डी. वाय. पाटील हे आजोबा आणि वडील डॉ. पी. डी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या वारशातून तरुणांच्या आकांक्षा आणि अपेक्षांना न्याय देण्याची शक्ती मिळेल, असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात झालेल्या विकासात आपलाही खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. भाजपने दिलेल्या संधीचे नक्की सोने करेन.’

असा आहे नऊ कलमी कार्यक्रम

कौशल्य विकास केंद्रे : उद्योगांना नेमक्या कोणत्या कौशल्यांची गरज आहे, हे तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर भर देणार आहे.

उद्योजकता आणि इन्क्युबेशन सेंटर्स : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये उद्योजकता आणि इन्क्युबेशन सेंटर्स विकसित करणार.

करिअर कौन्सिलिंग सेंटर्स : नव्या क्षेत्रांची माहिती आणि योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत करिअरची योग्य दिशा निवडण्यास मदत केली जाईल. यासाठी ५८ तालुक्यांमध्ये करिअर कौन्सिलिंग आणि मार्गदर्शनाची सुविधा विकसित केली जाईल.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे : ग्रामीण भागासह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये येतात. एका खोलीत आठ-आठ विद्यार्थ्यांना राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात दर्जेदार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे विकसित करणार.

नोकरदार महिलांसाठी सुरक्षित वसतिगृहे : कामानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या नोकरदार महिलांना सुरक्षित आणि आधुनिक सुविधा असलेली वसतिगृहे उभारणार.

वर्क फ्रॉम होमच्या संधी : अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज असते, तर अनेक व्यक्तींना घरातून काम करण्याची इच्छा असते. या दोन्ही गरजा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार.

मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती केंद्रे : नैराश्य आणि इतर मानसिक समस्यांवर योग्यवेळी समुपदेशन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती केंद्रे विकसित करणार.

उत्तरदायित्व आणि पारदर्शकता : मी निवडून आल्यावर दर तीन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर केलेल्या कामाची माहिती प्रसिद्ध करून पदवीधरांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार पुढील कामाचे नियोजन केले जाईल.

इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप : शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष उद्योगांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाल्यास विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र, कामाचे स्वरूप आणि भविष्यातील करिअरची दिशा समजण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news