Bitcoin | बिटकॉईन फेरतपासणीचे सत्र थंडावले ! वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची चुप्पी

Bitcoin | बिटकॉईन फेरतपासणीचे सत्र थंडावले ! वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची चुप्पी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिटकॉईन प्रकरणात सखोल तपास करून करोडो रुपयांचे बिटकॉईन लाटणार्‍यांचा पर्दाफाश करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चौकशी लावण्यात आली होती. एका मॅडम साहेबाच्या सांगण्यावरून हे सुरू असल्याची चर्चा पोलिस दलात होती. मात्र, तपास करून देखील काही हाती लागत नसल्यामुळे चौकशीचे हे सत्र थंडावल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत कमालीची गोपनीयता सुरुवातीपासूनच बाळगण्यात आली होती. चौकशीचे पुढे काय झाले, याबाबत विचारणा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवणेच पसंत केले आहे.

दरम्यान, मॅडम साहेब एकदा पुण्यात आल्या असता संबंधित तपास करणार्‍या अधिकार्‍यांना बोलावून घेतले होते. परंतु, कारवाई करण्यास अधिकार्‍यांनी असमर्थता दाखविल्याचे समजते. त्यामुळे तूर्तास तरी बिटकॉईन फेरतपासणीचे गणित बिघडले का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. दहा ते पंधरा दिवस दोन पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची चौकशी करण्यात येत होती. त्यांचे मोबाईलदेखील काढून घेण्यात आले होते. एवढेच नाही तर नांदेडमधील एका तक्रारदाराचा जबाब त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी नोंदविल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच, ज्या व्यक्तीकडून याबाबतचे लेखापरीक्षण करण्यात आले होते, त्यालादेखील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांची अनेकदा माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.

बिटकॉईनमध्ये आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत अमित व विवेक भारद्वाज या दोघांनी सुमारे साडेचारशेपेक्षा अधिक जणांना आर्थिक गंडा घातला होता. दोघांनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली होती. याप्रकरणी पुण्यात 2018 मध्ये दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. हा गुन्हा तांत्रिक असल्याने पोलिसांनी दोघांची सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. पुणे पोलिसांनी बिटकॉईन फसवणूक गुन्ह्यात मुख्य आरोपी अमित भारद्वाजसह 17 आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून फक्त 241 बिटकॉईन जप्त करण्यात यश आले होते. राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडून सप्टेंबर 2020 मध्ये या तपासाबाबत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर सेलने दिले होते. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू केला होता. या गुन्ह्यात झालेल्या तांत्रिक तपासाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. त्यावेळी पुणे पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या होत्या.

तसेच, इतर साथीदारांच्या वॉलेटवरही बिटकॉईन वर्ग केल्याचे आढळून आले होते. त्याने जप्ती पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या बनावट स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे समोर आले होते. त्यामुळे खोलात जाऊन तपास करून चोरांवरील मोर शोधून देखील या अधिकारी- कर्मचार्‍यांवर चौकशीच्या फेर्‍यात उभे केले जात असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news