रेल्वे स्थानक प्रवाशांनी ओव्हरलोड! गाड्यांच्या फेर्‍यांत आठ हजारांनी वाढ | पुढारी

रेल्वे स्थानक प्रवाशांनी ओव्हरलोड! गाड्यांच्या फेर्‍यांत आठ हजारांनी वाढ

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वे स्थानकावरून ये-जा करणार्‍या गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यंदाच्या आर्थिक वर्षात यामध्ये तब्बल 8 हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार ओव्हरलोड असल्याचे समोर आले आहे.
रेल्वेच्या माध्यमातून पुण्यात ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 200 पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची येथून ये-जा होत आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणेच पुणे आणि परिसरात नवीन रेल्वे टर्मिनल सुरू करण्याची आवश्यकता सुरू झाली आहे. त्यानुसार रेल्वेकडून तयारी सुरू असून, हडपसर येथे भव्य टर्मिनल उभारले जात आहे. परंतु, अद्यापपर्यंत हे सुरू झाले नाही. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची येथून ये-जा होत आहे.

12.71 टक्क्यांनी रेल्वे फेर्‍यांमध्ये वाढ

रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील आर्थिक वर्ष आणि यंदाच्या आर्थिक वर्षातील रेल्वेच्या फेर्‍यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2022-23 यामागील आर्थिक वर्षात 56 हजार 699 फेर्‍या झाल्या होत्या, तर यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन 2023-24 मध्ये 63 हजार 906 फेर्‍या झाल्याचे समोर आले आहे. यावरून तब्बल 8 हजारांपर्यंत फेर्‍यांमध्ये वाढ झाली असून, 12.71 टक्के वाढ झाल्याची नोंद रेल्वेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सरासरी महिन्याला सरासरी 655 अधिकच्या फेर्‍या झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करावी : मेंगडे
रेल्वेने जायचे म्हटले तर आम्हाला नेहमी गर्दीचाच सामना करावा लागतो. स्लीपर डब्यामध्ये अनेकदा आम्हाला जनरल डब्यातून प्रवास केल्याचा अनुभव येतो आणि ऑनलाइन तिकीट बुक करायला गेलो, तर 200 ते 300 प्रवाशांचे वेटिंग समोर येते. तसेच, हे वेटिंग पुढील तीन-तीन महिन्यांपर्यंत असते. त्यामुळे अनेकदा तिकीट काढूनही कन्फर्म न झाल्यामुळे आम्हाला प्रवास थांबवावा लागतो. त्यामुळे यावर रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि गाड्यांच्या संख्येत वाढ करावी, असे प्रवासी रवी मेंगडे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
रेल्वेकडून मिळणार्‍या चांगल्या सुविधेमुळे प्रवासी आकर्षित होत असून, मोठ्या संख्येने रेल्वे प्रवास करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आपोआपच रेल्वे गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. त्यांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहे.
– इंदू दुबे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग 
हेही वाचा

Back to top button