

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते. या लाभार्थ्यांचे घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अशा एकूण 8 हजार 600 दिव्यांगांचा सर्वेक्षण करण्यासाठी 35 लाख 26 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत महापालिका शहरातील दिव्यांगांना दरमहा पेन्शन, व्यवसायासाठी अनुदान व प्रशिक्षण देते, तसेच, विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. योजनांच्या लाभ घेणार्या दिव्यांगांचा घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
गुगुल मॅपद्वारे हे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. छायाचित्र, फेस रिडींग, थम्ब इम्प्रेशन, आयरीस ओळख ऑलनाइन घेतली जाणार आहे. तसेच, आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे ऑनलाइन स्कॅन केली जाणार आहेत. हयातीचा दाखला ऑनलाइन काढला जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी 1 कॉम्प्युटर ऑपरेटर, 1 समन्वय, 32 सर्वेअर आणि 1 पर्यवेक्षक नेमला जाणार आहे. हे सर्वेक्षण प्रत्येक प्रभागात 4 वेळा केले जाणार आहे. त्यांना ड्रेसकोड व ओळखपत्र दिले जाणार आहे. या माध्यमातून शहरातील 8 हजार 600 दिव्यांगांचा सर्वेक्षण करण्यात येईल. त्यामुळे लाभ घेणार्या सर्व दिव्यांगांची माहिती महापालिकेकडे जमा होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
हेही वाचा :