Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्यांशी आमचा काहीही संबंध नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती | पुढारी

Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्यांशी आमचा काहीही संबंध नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून संभ्रम तयार करू नका, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपसंबंधी आमची भूमिका देश व राज्य पातळीवर स्पष्ट आहे. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही.

महाविकास आघाडीची बैठक मुंबईत ३१ आँगस्ट रोजी आहे. दि. १ रोजी इंडियाची हयात हाॅटेलमध्ये बैठक आहे. त्याची जबाबदारी माझ्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. आम्ही ती उत्तमरितीने आयोजित करू. या बैठकीला काॅंग्रेसमधून कोण हजर राहणार हे माहित नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासंबंधी मविआमध्ये अद्याप काहीही चर्चा झालेली नसल्याचे पवार म्हणाले.

राज्यात दुष्काळी भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, यासंबंधी पवार म्हणाले, बारामतीसारख्या ठिकाणी टॅंकर लावण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी लोक चारा छावण्या सुरु करा अशी मागणी करू लागले आहेत. त्याचे मुख्य कारण पाऊस काही भागामध्ये नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्य शासनाने या संकटाकडे गांभिर्याने बघावे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पवार यांनी केले.

नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याच्या केंद्राच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, इथे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू लागल्यावर परदेशातून माल आणण्याची भूमिका केंद्र सरकार घेते. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की शेतकरी उत्पादकाला यातना कशा देता येईल ही भूमिका सरकार घेते आहे. आयात करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे.

नवाब मलिक यांच्या जामिनासंबंधी ते म्हणाले, मी काल त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाची आॅर्डर झाली पण अद्याप त्यांना बाहेर सोडलेले नाही. आज ते बाहेर येतील अशी शक्यता आहे. ते बाहेर आल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. सोलापूरला काल मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी उद्या अौरंगाबादला जाणार आहे. तिथे सार्वजनिक कार्यक्रम नाही. पण ना. धो. महानवर, प्राध्यापक विजय बोराडे यांच्या गावी जावून त्यांच्या कुटुंबांना भेटणार आहे. त्यानंतर मी बीडला जावून जाहीर सभा घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घटना चिंताजनक

ठाण्यात एका रुग्णालयात घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्री ठाण्यातील आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडत असतील तर राज्य कोणत्या दिशेनं चाललंय याचा उत्तम नमुना बघायला मिळाला. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. हे चित्र दुरुस्त करण्यासाठी अत्यंत कठोर पावले शासनाने टाकली पाहिजेत अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

सत्तेचा गैरवापर होतो आहे

जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आली त्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात आहेत. आमच्या सहकार्यांना नोटीसा आल्या आणि ते भाजप सोबत जाऊन बसले. आज तशीच भूमिका जयंत पाटील यांच्या संदर्भात घेतलेली दिसते. पण ते भूमिकेवर ठाम आहेत, असे शरद पवार म्हणाले.

मणिपूर प्रश्नावर केंद्राचे लक्ष नाही

देशात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मणिपूरचा आहे. चीनच्या सीमेवर हे राज्य आहे. मणिपूर सारख्या राज्यावर केंद्राचे लक्ष नसेल तर ही चिंतेची बाब आहे. संसद अधिवेशनात अनेकांनी हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला पण त्यावर चर्चा करण्याची मागणी करत असताना देखील ती मागणी पूर्ण झाली नाही. मणिपूरवर काही भूमिका घेणे गरजेचे होते, त्याचा अभाव पंतप्रधान यांच्या भाषणात दिसून आला. त्यातून काहीही पदरात पडले नाही. ३० वर्षांपूर्वी काय झाले, हे सत्ताधारी सांगतात पण ९ वर्षे भाजपच्या हातात ते राज्य आहे. नऊ वर्ष संधी देवून तुम्ही काय दिवे लावले, असा सवाल पवार यांनी केला.

हेही वाचा

शिर्डी : सुट्ट्यांमुळे साईनगरीत भाविकांचा महापूर

नगर : ग्रामपंचायत सदस्याचे घर पेटविले

Sharad Pawar : मणिपूर विषयावर केंद्र सरकार लक्ष देत नसेल तर देशासाठी चिंतेची बाब : खा. शरद पवार

Back to top button