सासवड: पुरंदर तालुक्यात यंदा दुष्काळाने कहर केला होता. नद्या, नाले कोरडे पडले होते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शिवारात चैतन्य पसरले आहे. तालुक्यात मे महिन्यात 15 दिवस वादळी पाऊस झाला.
गेले दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिली असून, शेतात वाफसा झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. खरीप हंगामातील वाटाणा, घेवडा, भुईमूग, बाजरी तसेच इतर कडधान्ये, तरकारी पिके आणि पालेभाज्यांची पिके घेण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. (Latest Pune News)
पुरंदरमध्ये खरीप हंगामातील वाटाणा हे तरकारी प्रवर्गातील पीक प्रसिद्ध आहे. कमी पाण्यावर आणि कमी वेळेत तोडणीस येणारे हे पीक असून, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे म्हणून ते प्रसिद्ध आहे. मे महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असून, पुढील काळात थोडा थोडा पाऊस झाला तरी वाटाणा पीक सहज येण्याची खात्री आहे. त्यामुळे वाटाणा पेरणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे चांबळीचे वाटाणा उत्पादक शेतकरी शहाजी कामठे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात बैलांचा वापर कमी होऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. त्यामळे शेतीची सर्व कामे, औषध फवारणी, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी विविध वाहनांचा वापर वाढला आहे.
मात्र, यांत्रिकीकरण कितीही वाढले तरीही पारंपरिक साधनांचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. नांगरणी, कोळपणी, पेरणी, सरी, वाफे तयार करणे तसेच अगदी पिकांना पाणी देण्यासाठी बैलांचा वापर होत असल्याचे बोपगावचे प्रगतशील शेतकरी प्रकाश फडतरे यांनी सांगितले.- सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर
मे महिन्यात पडलेला पाऊस हा पूर्वमोसमी आहे. सध्या वातावरण पाहून शेतीची मशागत पूर्ण करून ठेवणे व मान्सून दाखल झाल्यावर वाफसा अवस्थेत पेरणी करणे आवश्यक आहे. सध्या खरिपात कोणते पिके घ्यायची? कोणता वाण निवडायचा याबाबत शेतकर्यांनी निर्णय घ्यावा. गेले दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिली असून, शेतात वाफसा झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात करावी.
- सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर