

बारामती: शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिसाच्या अंगावर मोटार घालत त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार बारामतीत घडला. याप्रकरणी एका अज्ञात वाहनचालकाविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस हवालदार संतोष दत्तू कांबळे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. ते बारामती तालुका पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Latest Pune News)
गुरुवारी (दि. 29 मे) ही घटना घडली. कांबळे हे कर्तव्यावर असताना बारामती तालुका पोलिस ठाण्याजवळ ऐश्वर्या बेकरीसमोर काळ्या रंगाची दोन्ही बाजूला क्रमांक नसलेली वेरणा चारचाकी मोटारीवर चालक रहदारीच्या रस्त्यावर स्टंट करत होता.
हा चालक गाडी वेडीवाकडी चालवून जनमाणसांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कांबळे हे शासकीय वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पोलिस हवालदार गरुड व तरंगे हे होते. या तिघांनी गाडीची पाहणी केली, त्या वेळी ही गाडी लॉक करण्यात आली होती.
दरम्यान ही कोणाची गाडी आहे, याची ते परिसरात चौकशी करत असताना एक 24 वर्षे वयाचा तरुण त्यांच्याजवळ आला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. तू मोटारीतून स्टंटबाजी का करतो, अशी विचारणा केली असता त्याने पोलिसांशी अरेरावी केली.
पोलिसांनी त्याला तू वाहन बाजूला घे, अथवा पोलिस ठाण्यात घेऊन चल, अन्यथा गाडीला क्रेन बोलावून जागेवरून हटवावे लागेल असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून गाडी कुठेही न्यायची नाही असे म्हणत जोरजोराने आरडाओरडा सुरू केला. माझ्या नादाला लागला तर एकेकाला गाडीखाली घेऊन जीव घालवेन अशी धमकी त्याने दिली.
गाडीत चालक सीटवर त्याने बसून सुरुवातीला रिव्हर्स गीअर टाकत गाडी मागे घेत डिकीच्या बाजूने फिर्यादी यांना जोराची धडक दिली. त्यात फिर्यादी हे डोक्यावर पडल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांच्या सोबत असलेल्या अंमलदारांनी गाडी चालकास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने समोरील बाजूने गाडी त्यांच्या
अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तो जोरात तेथून निघून गेला. फिर्यादीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात नेण्यात आले. ते बेशुद्ध असल्याने तेथून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शासकीय कामात अडथळा करून जीविताला धोका निर्माण करणार्या त्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.