

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारात रविवारी (दि.01) एसटीचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगार प्रशासनाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी हा दिवस अविस्मरणीय ठरला. प्रवाशांना गुलाब पुष्प आणि पेढे वाटून आगाराने वर्धापन दिन आनंदात साजरा केला.
या विशेष दिनानिमित्त एसटीच्या गाड्यांना आकर्षकपणे सजवण्यात आले होते. वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केकही कापण्यात आला. (Latest Pune News)
स्वारगेट आगाराच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये प्रवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सोहळ्यात एसटीच्या स्वारगेट आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील आणि कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्यासह सहायक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढेरे आणि स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन हा वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी केला.
प्रवाशांना दिलेल्या गुलाब पुष्प आणि पेढ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता, ज्यामुळे या वर्धापन दिनाची सांगता अत्यंत समाधानाने झाली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सोमवारी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आगारात रक्तदान शिबिर राबवण्यात आले. यात आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागीत रक्तदान केले. यासोबतच ब्लड शुगर, हिमोग्लोबिन आणि कावीळ बाबत जनजागृती करण्यात आली.