खेड एमआयडीसीतील रस्त्याला मोठमोठे खड्डे

खेड एमआयडीसीतील रस्त्याला मोठमोठे खड्डे

भामा आसखेड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी भागातील कंपन्यांची वाहने आणि ठरावीक रस्त्यावरून मुरूम वाहतूक करणारे अवजड हायवा ट्रक जात असल्याने रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून, अशा रस्त्यावरून जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडले असून, त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वार खड्डा चुकविताना घसरून पडत आहेत.

एमआयडीसी विभागाचे रस्त्यांकडे दुर्लक्ष होत झाल्याने त्यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. उन्हाळ्यातील छोटे खड्डे पावसाच्या पाण्याने मोठे होऊन त्यात पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कामाचे पितळदेखील उघडे पडले आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना नागरिकांना मनस्ताप होत आहे.

एमआयडीसीतील काही रस्त्यांची चाळण केवळ अनधिकृत उत्खनन करून मुरूम घेऊन जाणार्‍या हायवा ट्रकने झाले आहे. दिवसरात्र मुरमाची वाहतूक करणारी वाहने ठरावीक रस्त्यावरून जातात त्या संपूर्ण रस्त्याची वाट लागल्याने रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. अनधिकृत उत्खनन करून मुरुमाची चोरी होत असताना या गंभीर प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याची वाट लावण्याला ही वाहने कारणीभूत ठरत आहेत.

शिंदे, वासुली, भांबोली या गावांच्या परिसरातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. दुरुस्तीमुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळून प्रवास सुखकर होऊन दररोजची अपघातांची मालिका खंडित होईल. एमआयडीसी विभागाचे प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी आणि अनधिकृत मुरूम वाहतूक करणार्‍या गाड्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन उभारण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news