Pune Navratri Festival 2026: पुण्यात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ; देवीदर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

सनईचे सूर, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक सजावटीने मंदिरांना साज; चतु:शृंगी, तांबडी जोगेश्वरीसह शहरातील देवी मंदिरांत विधिवत घटस्थापना
Pune Navratri Festival
Pune Navratri FestivalPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कुठे सनईचे मंजुळ सूर, कुठे ढोल-ताशांचा गजर... फुलांनी सजविलेली मंदिरे, रांगोळी पायघड्या, आकर्षक विद्युतरोषणाई, भक्तिगीतांनी प्रसन्न झालेले वातावरण अन्‌ ‘उदे ग अंबे उदे... जय अंबे गौरी!’चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात रविवारी (दि. ११) मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. शहर आणि उपनगरांतील मंदिरांमध्ये देवीला अभिषेक, पूजा करून सकाळी विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.

Pune Navratri Festival
Pune Mahalakshmi Temple Gold Crown: पुण्यातील महालक्ष्मी देवीला २ किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट

आदिशक्तीच्या आगमनानिमित्त सगळीकडे चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. काही ठिकाणी ढोल-ताशा आणि बँड पथकांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. देवीदर्शनासाठी पहिल्याच माळेला भाविकांनी गर्दी केली, तर भजन-कीर्तन, प्रवचन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला. मंगळवारपर्यंत (दि. २०) सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

Pune Navratri Festival
Smitatai Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिताताई जाधव यांचा इंदापूरमध्ये प्रचार

नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या आराधनेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव! या उत्सवानिमित्त शहर आणि उपनगरांतील देवीची मंदिरे पहिल्या दिवशी आकर्षक सजावटीने नटली. मंदिरांच्या प्रवेशद्वारांवरील फुलांची तोरणे, रंगबिरंगी फुलांची सजावट आणि रांगोळीच्या मनोहारी पायघड्यांनी लक्ष वेधून घेतले. रविवारी सकाळी घटस्थापनेपूर्वी काही मंदिरांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात आणि बँड पथकांच्या उत्कृष्ट वादनात मिरवणुका काढण्यात आल्या. मंत्रोच्चार, वाद्यांचा निनाद आणि देवीच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. विविध मंदिरांमध्ये मान्यवर, पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, महापूजा तसेच महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.

Pune Navratri Festival
Pune Vegetable Market Rates: पुण्यात नवरात्रोत्सवामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; भेंडी, मिरची, शेवगा महागले

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

देवीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. पहिल्याच माळेला भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. देवीकडे सुख-समृद्धीची आणि भरभराटीची कामना करीत आदिशक्तीची आराधना केली. त्यानंतर दिवसभर भजन-कीर्तनाचे, प्रवचनांचे आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगले. सकाळी झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत सुरूच होती. भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा संगम घडविणाऱ्या आदिशक्तीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. पुढील नऊ दिवस मंदिरांमध्ये आदिशक्तीचा जागर आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)

मंदिरात भिडे कुटुंबीयांच्या हस्ते रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभापासूनच मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. देवीदर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)

मंदिरात रविवारी पारंपरिक पद्धतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिरात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीकडे भाविकांनी जीवनात सुख, समृद्धी आणि मांगल्य नांदावे, अशी प्रार्थना केली. मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

चतु:शृंगी मंदिर देवस्थान (सेनापती बापट रस्ता)

चतु:शृंगी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता सालकरी श्रीधर अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. देवीला मंगलस्नान घालून पंचामृत आणि सुगंधी द्रव्यांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीला सालंकृत पोशाख परिधान करून महापूजा करण्यात आली आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीराम नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. उत्सवकाळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र खुले राहणार असून, रोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे.

Pune Navratri Festival
Pune Market Rates: पुण्यात डाळी महागल्या; साखर, गुळाच्या दरातही वाढ

भवानीदेवी मंदिर (भवानी पेठ)

मंदिरात सकाळी महारुद्राभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी उत्सवात रंग भरला. भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सुख-समृद्धी आणि मांगल्यासाठी प्रार्थना केली. उत्सवात मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

तळजाईमाता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर)

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिरात उत्सवानिमित्त विद्युतरोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)

शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरात दिनेश कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहिल्या माळेला देवीदर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली. देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

वनदेवी मंदिर (कर्वेनगर)

नवरात्रोत्सवानिमित्त परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध पथकांनी लक्ष वेधले. मिरवणुकीनंतर मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी उत्सवाचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. देवीदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news