

वैभव धाडवे पाटील
सारोळा: भोर व राजगड तालुक्यात लाल माती उत्खननासोबतच तिच्या वाहतुकीचा सुळसुळाट वाढला असून ‘ओव्हरलोड’ हायवा गाड्यांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक चर्चेचा विषय ठरली आहे. वाहनक्षमतेपेक्षा अधिक माती भरून नियमबाह्य पद्धतीने वाहतूक केली जात असतानाही पोलिस, ‘आरटीओ’ आणि महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या संपूर्ण प्रकाराला प्रशासनाचेच मूक समर्थन असल्याचा आरोप ग््राामस्थांकडून केला जात आहे.
भोर-राजगड परिसरात सध्या लाल माती वाहून नेणाऱ्या जवळपास पन्नासच्या आसपास हायवा गाड्या दिवसरात्र धावताना दिसतात. या गाड्यांमध्ये वाहनक्षमतेपेक्षा जास्त माती भरली जात असून, अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचा सर्रास भंग केला जात आहे. मात्र, या गाड्यांकडे पोलीस आणि ‘आरटीओ’ विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
दुसरीकडे सर्वसामान्य वाहनधारकांच्या छोट्या-मोठ्या चुका पकडून मोठमोठे दंड आकारले जातात. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आव आणला जात असला तरी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ‘ओव्हरलोड’ माती वाहतुकीवर मात्र कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भोर-राजगड तालुक्यातील अनेक ठिकाणी नाममात्र परवाने काढून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचे चित्र आहे. या उत्खननातून काढलेली लाल माती हायवा गाड्यांमधून अतिलोड पद्धतीने वाहून नेली जाते. या सर्व प्रकारात पोलीस, महसूल व ‘आरटीओ’ विभागातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप ग््राामस्थांनी केला आहे.
याबाबत स्थानिक समाजसेवक किंवा लोकप्रतिनिधीही पुढे येताना दिसत नसल्याची खंत ग््राामस्थ व्यक्त करत आहेत. उलट, या व्यवसायात गुंतलेल्या काही धनदांडग्यांकडून ‘आमच्या नादाला लागू नका’ अशा पोकळ धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही ग््राामस्थांनी केला आहे. राजगड पोलीस, भोर पोलिस तसेच सासवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अनेक हायवा गाड्या नियमितपणे धावताना दिसतात. तरीही वाहनक्षमतेपेक्षा जास्त माती वाहतूक करणाऱ्या या गाड्यांवर पोलीस किंवा आरटीओकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्याचप्रमाणे उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनरीवरही कारवाईचा अभाव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आजतागायत या ‘ओव्हरलोड’ हायवा गाड्यांवर किंवा नियमबाह्य उत्खनन करणाऱ्या जेसीबीवर महसूल, पोलीस किंवा ‘आरटीओ’ विभागाने ठोस कारवाई केल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. परिणामी, दिवस-रात्र सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे परिसरातील शांतताभंग होत असून, पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नियमबाह्य उत्खनन व अतिलोड माती वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्यांवर तातडीने धडक कारवाई करावी, अशी मागणी गावागावातील ग््राामस्थांकडून केली जात आहे.
नियम सर्वसामान्यांसाठीच का?
‘पोलिस आणि ‘आरटीओ’चे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’ असा सवाल ग््राामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. छोट्या वाहनचालकांवर कारवाई करताना प्रशासन तत्पर असते; मात्र, ओव्हरलोड लाल माती वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्या व उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनरीवर कारवाई करण्याचे धाडस अधिकाऱ्यांकडून होत नाही, अशी टीका स्थानिकांनी केली. लाल मातीच्या तस्करीत काही अधिकाऱ्यांचे हात माखलेले असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.