सकाळी शिवसेनेने, तर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने केले एकाच रस्त्याचे भूमिपूजन

सकाळी शिवसेनेने, तर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने केले एकाच रस्त्याचे भूमिपूजन

नायगाव : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या राजुरी पोंढे ते वाघले वस्ती या रस्त्याच्या कामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन झाले. सकाळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी, तर सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. निवडणुका तोंडावर आल्या की विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी इच्छुक व पदसिद्ध उमेदवारांमध्ये स्पर्धा लागते. त्याचा प्रत्यय पोंढे (ता. पुरंदर) येथे दिसून आला. पोंढे व राजुरी येथील स्थानिक शिवसैनिकांनी पोंढे – राजुरी रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता केले. या वेळी राजुरी येथील आप्पा भंडलकर, माजी उपसरपंच विपुल भगत,शाखा प्रमुख पांडुरंग भगत,शिवाजी भगत, पोंढे येथील संतोष वाघमोडे, नाना काळे,भाऊ वाघमोडे,राजू वाघले,दादा वाघले,संतोष वाघले उपस्थित होते.

याच दिवशी सायंकाळी सात वाजता खासदार सुप्रिया सुळे,आमदार संजय जगताप,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित रस्त्याचे भूमिपूजन झाले. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याच्या कामासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे शिवसैनिकांनी पाठपुरावा केल्यानेच निधी मंजूर झाला आहे. श्रेय मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आल्याचा आरोप करीत स्थानिक शिवसैनिकांनी कामाचे भूमिपूजन केले. तर खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्याकडेच ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने राजुरी पोंढे रस्त्यासाठी निधी मिळाला आहे. यामुळे त्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news