संतोष वळसे पाटील
मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिरात पुजार्यांचा सुळसुळाट झाला असून, काही पुजार्यांकडून भाविकभक्तांची विविध धार्मिक कार्यक्रमाच्या, देवाच्या दर्शनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याच्या घटना समाजमाध्यमांच्या माध्यमातून चव्हाट्यावर आल्या आहे.
काही पुजारी ओळखीच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क करून भाविकभक्तांना मंदिरातून दर्शन घडवून आणतात. त्या बदल्यात पैसे घेत आहेत. मंदिरात विविध होम हवन करणे, देवाची पूजा करणे, अभिषेक करणे यासाठी 2 ते 5 हजारांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. तासनतास रांगेत उभे राहून अनेकांना दर्शन मिळत नाही; मात्र पुजार्याची ओळख असेल तर पैसे देऊन तत्काळ दर्शन मिळत असल्याचा सर्वत्र बोभाटा आहे. (Latest Pune News)
शनिवार, रविवार, सोमवार अभिषेक बंद ठेवण्याची मागणी
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शनिवार, रविवार आणि सोमवार वगळता दिवसभरात 70 ते 80 हजार भाविक येतात, तर वरील तीन दिवशी येथे एक लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात ही संख्या दररोज दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक असते. त्यावेळी मंदिरापासून तीन ते चार किलोमीटर दूरवर भाविकांच्या रांगा लागतात.
सुटीच्या दिवशीच मंदिरातील पुजारी गाभार्यात भाविकांचे अभिषेक घालतात. यामुळे अनेक भाविक मंदिरात बसून राहतात व इतर भाविकांना दर्शन घेताना अडचण निर्माण होते. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवशी पुजार्यांनी अभिषेक बंद ठेवावा व आलेल्या भाविकांना लवकरात लवकर दर्शन कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भीमाशंकर देवस्थान येथे अभिषेक करणार्या भाविकांनी पावती घेतलीच पाहिजे. त्यामुळे पारदर्शकता वाढू शकते. जर कोणी पैसे घेऊन पावती देत नसेल तर त्याच्याविरोधात देवस्थानकडे तक्रार करावी. म्हणजे कायदेशीर कारवाई करता येईल.
- सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान