

लोणावळा: पुणे ते मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळा गावाच्या हद्दीत एक कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या अपघातानंतर पोलिसांनी कारमधून अंदाजे 700 किलो प्राण्याचे मांस जप्त केले आहे. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर क्र. 45 जवळील बोगद्याच्या समोरील यू-टर्नजवळ या कारने सिमेंट डिव्हायडरला जोराची धडक दिली. अपघातानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. (Latest Pune News)
पोलिस नोंदीनुसार, कारच्या मागील भागात काळ्या प्लास्टिकमधून झाकलेले प्राण्याचे कातडी काढलेले मांसाचे भाग आढळले. अंदाजे 700 किलो मांसाची किंमत 2 लाख 80 हजार, तर डस्टर कारची किंमत 2 लाख 60 हजार असून, एकूण मुद्देमाल 4 लाख इतका आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 नोंदवण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.इ. सूर्यकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.