

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे नूतनीकरण व विकास आराखड्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवार (दि.9) पासून पुढील तीन महिने मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मंदिर परिसरातील सभामंडपाचे बांधकाम तसेच विविध विकासकामे सुरू होणार असल्याने भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
या कालावधीत मुख्य गर्भगृहात प्रवेश बंद राहणार आहे. भीमाशंकरकडे जाणारे सर्व मार्ग तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग््राी, बांधकाम साहित्य व कामगारांची वर्दळ असणार आहे. या काळात अपघात टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचे पाऊल उचलले आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिराचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी अधिक सुविधा, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उभारण्यासाठी हे काम अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.