

पुणे: दिवाळी काळात शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामेट्रोने बंद केलेला भिडेपूल दिवाळी संपताच पुन्हा बंद करण्यात आला आहे. येथील पुलाचे काम ही डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केल्याने हा पूल नव्या वर्षांतच खुला केला जाण्याची शक्यता आहे. हा पूल बंद असल्याने मात्र, शहरातील वाहतुकीवर ताण येणार आहे. (Latest Pune News)
महामेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून नारायण पेठ आणि सदाशिव पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरील बाजूस पादचारी पूल उभारला जात आहे. या कामासाठी गेल्या काही महिन्यांपासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे, तसेच नदीपात्रातील रस्त्याने डेक्कन जिमखाना आणि नारायण पेठेत ये- जा करणारे वाहनचालक या पुलाचा वापर करतात. मात्र, पूल बंद असल्याने वाहनचालकांना वळसा घालून पुन्हा डेक्कन जिमखान्याकडे यावे लागत होते.
दिवाळीत लक्ष्मी रस्ता व मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली जात होती. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोकडून 11 ऑक्टोबरपासून तो खुला करण्यात आला होता. मात्र, शुक्रवार (दि 24) सकाळपासून बाबाराव भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
या पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, परिणामी मध्यवर्ती पेठांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पुलाचे काम बंद होते. तर गणेशोत्सवाच्या कालावधीतही काही बंद असलेला पूल काही दिवस सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामावर परिणाम झाला आहे.
या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड साधनांचा वापर असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पूल बंद ठेवावा लागतो, असे स्पष्टीकरण महामेट्रो प्रशासनाने दिले आहे. या पुलाचे उर्वरित काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले असल्याने पुढील वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.