

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने संपूर्ण राज्याला रविवार (दि. २६ ऑक्टोबर) पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश भागात २५ व २६ रोजी तर काही भागात २८ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावली.
अरबी समुद्रात गेल्या पाच दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. लक्ष्मी पूजनाच्या दिवसापासून पाऊस पुन्हा सुरू झाला. तसेच पाडव्याच्या दिवशीदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच शुक्रवारीदेखील पुणे शहरासह राज्यातील काही भागात दुपारच्या वेळी जोरदार पाऊस बरसला. आगामी २४ तासांत अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकणार असल्याने २५ व २६ रोजी संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यलो अलर्टचा इशारा (कंसात तारखा)
पालघर, ठाणे, मुंबई (२५, २६), रायगड (२५ ते २७), रत्नागिरी (२५ ते २७), सिंधुदुर्ग (२५, २६), धुळे (२५,२६), नंदुरबार (२५,२६), जळगाव (२५), नाशिक (२५, २६), नाशिक घाट (२५, २६), अहिल्यानगर (२५ ते २७), पुणे घाट (२५ ते २७), कोल्हापूर घाट (२८), सातारा (२५), सांगली (२५), सोलापूर (२५, २६), संभाजीनगर (२५), परभणी (२५), बीड (२५,२७), नांदेड (२६, २८), लातूर (२६, २७), धाराशिव (२५, २७), अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, (२५ ते २७), भंडारा (२५), गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ (२५, २८), वर्धा, वाशिम (२५, २६).