Bhagyashree murder case : भाग्यश्रीच्या मोबाईलबाबत मोठा खुलासा

Bhagyashree murder case : भाग्यश्रीच्या मोबाईलबाबत मोठा खुलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाग्यश्री सुडे हिचे दागिने आणि मोबाईल विमानतळ पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केले आहेत. सोनसाखळी, मोबाईल, कानातील रिंगा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींनी येथील कचर्‍याच्या कुंडीत मोबाईल टाकून दिला होता. बुधवारी (दि. 10) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22, रा. लिव्हिंग प्रिसो हाऊस साकोरेनगर, विमाननगर, मूळ. मु. पो. हरंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) या महाविद्यालयीन तरुणीचा तिच्या मित्राने आपल्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन खंडणीसाठी अपहरण करून 30 मार्च रोजी खून केला होता.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी शिवम माधव फुलवळे (वय 21, रा.ऑक्सी हेवन सोसायटी, वाघोली, मूळ नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (वय 23, रा. मुंबई, मूळ रा. सकनूर, नांदेड), सागर रमेश जाधव (वय 23, रा. कासलेवाडी, ता. शिरोळा अनंतपाळ, जि. लातूर) या तिघांना अटक केली आहे. शिवम हा या घटनेतील मुख्य सूत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.
तिघे आरोपी सध्या विमानतळ पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. आरोपींकडून 9 लाखांच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगण्यात येते आहे.

मात्र, असे जरी असले तरी पोलिसांना अन्य गोष्टींबाबत संशय आहे. आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरण्यापूर्वी तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. तसेच, तिच्या मोबाईलवरून खंडणीची मागणी केल्यानंतर, मोबाईल फेकून दिला होता. बुधवारी शिवम याच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळकोळी गावात जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्या वेळी दागिने आणि मोबाईल मुखेड येथे मिळून आले. मुखेड येथील गेस्ट हाऊसच्या कचर्‍यात मिळून आला.

मोबाईलचे विश्लेषण

पोलिसांनी मोबाईल मिळवला असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतरच काही गोष्टी समोर येण्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. तसेच, गुन्ह्यामागचे नेमकं कारणही समोर येण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या गाडीतून भाग्यश्रीचे अपहरण करून खून करण्यात आला, तीच गाडी घेऊन आरोपींनी नांदेड गाठले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news