

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
जावेच्या मुलाला मारहाण करीत तिच्या घरावर दगडफेक केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी दीडच्या सुमारास पवनानगर कॉलनी, काळेवाडी येथे घडली. या प्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. 24) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, नजमा अहमद शेख (वय 40, रा. पवनानगर, काळेवाडी), हुजेफ अहमद शेख (वय 22, रा. नानापेठ, पुणे), सलमा मदार शेख (60, रा. नानापेठ, पुणे), हुदा अस्लम शेख (वय 21,कोकणे चौक, राहटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नजमा ही फिर्यादी महिलेची जाऊ आहे.
दरम्यान, आरोपी आणि फिर्यादी यांचा मुलगा यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांना बोलावून शिवीगाळ केली. दरम्यान, तेथे आलेल्या अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला असता आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.