काळजी घ्या ! उष्णतेचा कहर कायम; हवामान खात्याकडून राज्यातील ‘या’ भागाला स्पेशल अलर्ट

काळजी घ्या ! उष्णतेचा कहर कायम; हवामान खात्याकडून राज्यातील ‘या’ भागाला स्पेशल अलर्ट
Published on
Updated on

पुणे : वृत्तसंस्था : महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान 41 अंशांवर गेले आहे. ठाणे जिल्ह्यातील कर्जतचे तापमान 44.4 अंश सेल्सिअसवर गेल्याने ते सर्वाधिक उष्ण शहर ठरले. महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने स्पेशल अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत 'हीट वेव्ह' कायम असेल.
सतत 3 दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या तापमानात वाढ आहे. दरम्यानच्या काळात काही भागांत ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असेदेखील हवामान विभागाने म्हटले आहे.

सातारा, रत्नागिरीत 'हिट वेव्ह'

हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

कोकणात पाऊस पडणार

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्‍यासह (30-40 कि.मी. प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (दि. 18) पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे, बीड, सोलापूर, जळगाव, नाशिकमध्ये गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी, शनिवारीही (दि. 19-20) राज्यात 'हिट वेव्ह' कायम असेल. 20 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगालच्या गंगा खोरे भागात, सौराष्ट्र, कच्छ, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम असेल.
बुधवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट उसळली होती. नगर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि एरव्ही उन्हाळ्याची दाहकता फारशी न जाणवणार्‍या कोल्हापूरमध्येदेखील उन्हाचा कडाका प्रचंड होता.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत गुरुवारीही उष्णतेची तीव्र लाट शक्य आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर, नगर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्येदेखील उन्हाचा कडाका वाढेल. या भागांत काही ठिकाणी वादळी वार्‍यांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शनिवारी विदर्भ तापणार

शनिवारी (दि. 20) विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, जळगाव, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उन्हाचा पारा वाढेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारीही उष्णतेची लाट उसळली होती. हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यांत सध्या तापमान 40 अंशांखाली असून, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गारपीट, पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या राज्यांतील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही ठिकठिकाणी पाऊस झाल्याने तापमानाचा पारा जरा खाली आलेला होता.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात गुरुवारी गारपीट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळमध्ये धुळीचे वादळ येईल. केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये शुक्रवारीही उष्णतेची लाट कायम राहील. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये धुळीचे वादळ शक्य आहे. ताशी 40 कि.मी. वेगाने वारे या राज्यांत वाहतील. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट राहील. बिहारमध्ये तीव्र उष्णता असणार आहे.

देशात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार असल्याने काही राज्यांतून गुरुवारी व नंतर हिमवृष्टी, पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स किती परिणामकारक ठरेल, हे आताच सांगता येत नाही. एक-दोन दिवसांनीच वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अचूक अंदाज बांधता येईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले. आठवडाभरापूर्वी वेस्टर्न डिस्टर्बन्स इराण-पाकिस्तानच्या बाजूने सक्रिय झाले होते आणि उत्तर-मध्य भारतातील राज्यांतून निघून गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स ईशान्येकडील राज्यांत सक्रिय होईल.

ठाणे, मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

  • पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतही इशारा
  • रायगड, रत्नागिरीत आज पावसाची शक्यता; सोलापुरात 'हीट वेव्ह!'
  • महाराष्ट्र, एमपी, यूपीसह 9 राज्यांतही तापमान 41 अंशांवर
  • हिमाचल, उत्तराखंडमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता

नागरिकांसाठी हा सल्ला…

शक्यतो दुपारचे घराबाहेर पडू नये. फार आवश्यक असल्यास उन्हात बाहेर जाण्यापूर्वी पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्यानंतर थोडे सावलीत थांबावे; मग निघावे, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news