

बारामती: जुन्या कारणावरून सोनगाव (ता. बारामती) येथे एका महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून धारदार चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना दि. 22 डिसेंबर 2025 रोजी घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर बारामती पोलिसांनी अटक केली आहे.
Slug without dashes:
नियोजन संदीप भोसले (रा. सोनगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत कांचन साक्षर भोसले (वय 38 रा. सोनगाव) या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी नियोजन याच्याविरोधात दि. 24 डिसेंबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना आरोपीने घराचे दार फोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला. त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर गंभीर जखम होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलिस हवालदार भारत खारतोडे, अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार व जितेंद्र शिंदे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
अटक केलेल्या नियोजन याला पुढील कारवाईसाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर यापूर्वी बारामती शहर पोलिस ठाणे हद्दीत सात, वालचंदनगर हद्दीत दोन असे एकूण नऊ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये चोरी व मारामारीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तो चार गुन्ह्यांमध्ये फरार होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, अंमलदार राजू बन्ने अधिक तपास करत आहेत.