Vegetable Price: वाढत्या उष्म्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले; ग्राहकांच्या खिशाला झळ

शेतकऱ्यांनाही मर्यादित फायदा
Vegetable Price
Vegetable PricePudhari
Published on
Updated on

काटेवाडी: बारामती तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेचा परिणाम आता थेट भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. कडक उन्हामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, तालुक्यातील सोनगावच्या आठवडे बाजारात टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीसह विविध पालेभाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून, दुसरीकडे शेतकऱ्यांनाही अपेक्षित फायदा मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्णतेमुळे भाजीपाला पिकांवर ताण येत असून, अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. विशेषतः कोथिंबीर, मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.

Vegetable Price
kedgaon News: केडगाव परिसरात गर्भलिंगनिदान रॅकेट सक्रिय? चर्चेला मोठे उधाण; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

सोनगावच्या आठवडे बाजारात कोथिंबिरीची जुडी 20 ते 40 रुपयांवर पोहोचली असून, टोमॅटोचे दर प्रतिकिलो 40 ते 50 रुपये झाले आहेत. हिरवी मिरची, वांगी, भेंडी, काकडी यांच्याही दरातवाढ झाली आहे. मेथी, चाकवत, शेपू, पालक व तांदुळशा या भाज्याचे ही भाव वाढल्याने भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाढत्या दरांमुळे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. भाव वाढले असले तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. उष्णतेमुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. मजुरी, औषधे व वाहतूक खर्च वाढल्याने मिळणारा दर परवडत नाही, अशी प्रतिक्रिया काही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकरी सांगतात की, उन्हाच्या तीवतेमुळे टोमॅटो आणि पालेभाज्या लवकर सुकतात. बाजारात पोहोचेपर्यंत अनेकदा माल खराब होतो. त्यामुळे बाजारभाव वाढले असले, तरी प्रत्यक्षात निव्वळ नफा मर्यादित राहत आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून पिके टिकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Vegetable Price
Indapur Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा इंदापूरला तडाखा

आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे सांगितले. दर वाढल्यामुळे ग्राहक कमी प्रमाणात भाजी घेत आहेत. त्यामुळे विक्रीवर परिणाम होत असल्याचे अनिल पाटोळे या भाजी विक्रेत्याने सांगितले.

वाढत्या उष्णतेने भाजीपाला उत्पादन, बाजारातील आवक आणि ग्राहकांची खरेदी क्षमता या तिन्ही गोष्टींवर परिणाम झाला असून, पुढील काही दिवस तापमान असेच राहिल्यास भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहक उशिरा बाहेर पडतआहे. त्यामुळे दुकानदाराला प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news