बारामतीत नवीन प्रकल्पांसाठी हवीय राजकीय इच्छाशक्ती; उद्योगक्षेत्रासह नागरिकांचे मत

बारामतीत नवीन प्रकल्पांसाठी हवीय राजकीय इच्छाशक्ती;  उद्योगक्षेत्रासह नागरिकांचे मत
Published on
Updated on

अनिल सावळे पाटील

जळोची : चाकण, पिंपरी-चिंचवड, शिरवळ येथील एमआयडीसीसारखे नवीन प्रकल्प बारामतीत येऊ शकतात. त्यासाठी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे. त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजकांना आवाहन केल्यास हे अशक्य नाही, असे मत बारामतीतील नागरिक व्यक्त करीत आहेत. बेरोजगार समितीनेही हेच मत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात बारामतीची मोठी प्रगती झाली.

महाविकास आघाडीची सत्त्ता आल्यापासून बारामतीमध्ये गतीने विकासकामे सुरू आहेत. परंतु, एमआयडीसीत एकही नवीन कंपनी आली नाही, हे दुर्दैव असल्याचे मत बर्‍हाणपूर येथील अमोल चांदगुडे व पदवीधर बेरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष सतीश शिरकांडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाचे विविध प्रकल्प येत आहेत. निधी उपलब्ध होत आहे. कामे प्रगतिपथावर आहेत; मग एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या का आणल्या जात नाहीत, असा प्रश्न स्पेनटेक्स कंपनीचे माजी कर्मचारी राहुल शिंदे यांनी केला.

युवकांच्या लोकसंख्येचा विचार करता एमआयडीसीमध्ये अपुरा रोजगार आहे. बारामतीबरोबरच इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण, कर्जत, जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील अनेक युवक रोजगारासाठी विविध कंपन्यांच्या गेटवर येत असतात. हे चित्र वारंवार दिसते. त्यामुळे एकतरी कंपनी बारामती एमआयडीसीमध्ये यावी, यासाठी उपमुखमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा बारामती तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आहे.

गोडाऊन भाड्याने देण्याची वेळ

अनेक युवा उद्योजक भाडोत्री किंवा छोट्या एमआयडीसीच्या प्लॉटवर उद्योग करीत होते. परंतु, कधी मंदीची लाट तर कधी कोरोनामुळे उद्योग संपले. अडचणीतील मूळ मालकांनी गोडाऊन उभे करून मोठ्या कंपन्यांना भाड्याने देणे, हा व्यवसाय सुरू झाला. नवीन कंपन्यांचे काम छोट्या उद्योजकाला मिळाले, तर गोडाऊनला जागा कोणी देणार नाही, उलट छोटे उद्योजक वाढतील, अशी माहिती उद्योजक शार्दूल सोनार यांनी दिली.

सह्याद्री अ‍ॅग्रोची 250 एकर जागा पडून

कटफळ हद्दीमधील सह्याद्री अ‍ॅग्रोची 250 एकर जमीन एमआयडीसीकडे आहे. मात्र, त्यावर अद्याप एकही नवीन प्रकल्प आला नाही, जागा पडून आहे. सत्ता येऊन दोन वर्षे होऊन गेली. आतातरी त्या जागेवर नामांकित कंपनी लवकरात लवकर आणण्यासाठी प्रत्यन करावेत, यासाठी युवकांचे शिष्टमंडळ खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news