

बारामती: हॉटेलच्या बिलाच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून बारामतीत हॉटेल व्यावसायिकावर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिस वेळेवर पोहोचले नसते तर हॉटेल व्यावसायिकाला जीवाला मुकावे लागले असते. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी विक्रम जगताप (रा. खांडज, ता. बारामती) व जयदीप भागवत भोसले (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) या दोघांना अटक केली. मुख्य आरोपी अक्षय सुनिल जगताप (रा. माळेगाव कारखाना, ता. बारामती) व त्याचा साथीदार महादेव ऊर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे सध्या फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे.
महेंद्र धोंडीबा गायकवाड (रा. 22 फाटा, खांडज, ता. बारामती) यांच्यावर दि. 22 रोजी दुपारी मोरगाव रस्त्यावरील ग्लोबल हॉटेलसमोरील मैदानात चौघांनी प्राणघातक हल्ला केला. दि. 21 फेबुवारी रोजी रात्री फिर्यादी गायकवाड व आरोपींमध्ये हॉटेलच्या बिलाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातून ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती. हल्ल्यावेळी एका साथीदाराने आसपासच्या नागरिकांना धमकी दिली.
दरम्यान बघ्यांपैकी एकाने पोलिसांना याची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व सहकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनाद्वारे जखमीला बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांच्या त्वरित उपचारांमुळे व पोलिस दलाच्या जलद निर्णयक्षमतेमुळे जखमीचा जीव वाचला. पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, हवालदार सुलतान डांगे, अमोल शिंदे, गिरीश नेवसे, वैभव मदने, राहुल बडे, रईस मुलाणी यांनी या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.