

परिंचे: गुंजवणी आणि भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने वीर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वीरमधूनही निरा कालव्यात विसर्ग सुरू आहे. धरणात असलेल्या मुबलक पाणीसाठ्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळा यंदा सुसह्य जाणार आहे. निरा धरण साखळीत सध्या 75.71 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नदीच्या धरण साखळीतील गुंजवणी, भाटघर, निरा देवघर व वीर धरणाचा मोठा आधार आहे. याच धरणातील पाण्यावर या भागात शेती उत्पादनात क्रांती झाली आहे.
सोमवारी (दि.23) धरणात 75.71 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. निरा खोऱ्यातील चारही धरणांत सध्या 32.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला या धरणात 24 टीएमसी म्हणजे 50 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी निरा खोऱ्यात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडणार नाही.
या भागत सध्या ऊस, गहू, हरभरा, टोमॅटो, कांदापिके तसेच तरकारी उपलब्ध पाण्यामुळे जोमदार आहेत. उसाची काढणी झालेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी चारा पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जुलै महिन्यापर्यंत जरी पुरेसा पाऊस झाला नाही तरी वीर धरणामध्ये चांगला साठा असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवू शकत नाही. निरा नदीवरील बहुतांश बंधारे पूर्णक्षमतेने भरलेले आहेत.
वीर धरणातून नीरा डावा कालव्यात 648 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निरा उजवा कालवा 1550 क्युसेकने चालू आहे. त्यामुळे नदीकाठ व कालव्यावर अवलंबून असलेला शेतकऱ्यांची सिंचनाची अडचण दूर होणार आहे, असे धरण प्रशासनाचे कर्मचारी संभाजी शेडगे यांनी सांगितले.