

बारामती: तालुक्यातील तापमानाने एप्रिलच्या मध्यातच कळस गाठला असून, सलग दोन दिवस तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्णतेमुळे संपूर्ण बागायती पट्टा होरपळून निघत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळले जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कामगार वर्गाला या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. उन्हाच्या तीवतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे.
दरम्यान, उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक थंड पेय, सरबत, कलिंगड, खरबूज आदी फळांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत थंड पेय आणि हंगामी फळांची मागणी वाढली आहे. विक्रेत्यांनाही याचा काही प्रमाणात फायदा होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात सध्या बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या महागाईचा दुहेरी परिणाम नागरिकांसह शेतकरी वर्गावर होत आहे.
अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाखा वाढल्याने वातावरणात मोठा बदल झाला असून, याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. उष्णतेमुळे बाजारपेठांमध्ये दुपारच्या सत्रात तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. ग््राामीण भागात पाण्याची मागणी वाढू लागली असून, काही ठिकाणी पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. शेतीमध्ये अवकाळी पावसामुळे आधीच नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांना आता वाढत्या तापमानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती आहे. भाजीपाला आणि फळबागांना याचा फटका बसला आहे.. उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील अस्थिर दर यामुळे शेतकरी आर्थिक तणावाखाली सापडले आहेत.
आणे पठारावर पाणी, चाराटंचाई
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, नळावणे, व्हरुंडी (शिंदेवाडी) परिसरात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तळी आणि विहिरी आटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या भागात उन्हाळ्याच्या तीवतेमुळे नैसर्गिक पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. परिणामी जनावरांना पिण्याच्या पाण्यासह हिरवा चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. रुंदी (शिंदेवाडी) येथील माजी सरपंच रोहिदास शिंदे म्हणाले, पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादन घटले आहे. यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी. दरम्यान, या परिस्थितीवर शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या भागातील वन्य प्राण्यांना देखील पाण्याची तीवता भासू लागली आहे. वन विभागाने टँकरच्या माध्यमातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. या भागामध्ये बिबटे, कोल्हे, ससे, हरीण आदी प्राण्यांचा वावर आहे. हरीण व रानडुक्कर पिकांचे नुकसान करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्यांनी वाटाण्याचे पीक घेतले आहे. परंतु, हे प्राणी या पिकाचे नुकसान करीत आहेत.