

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर दि. 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी उसळलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.
या वेळी वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 20 लाख 50 हजार रुपयांची चोरी झाली होती. तालुका पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. राजकुमार बाबूराव आठवले (रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनिस मोहम्मद युनूस, एजाज भगू मीरावले, मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (तिघे रा. मोतीनगर, ता. डिग््राज, जि. यवतमाळ), बाळू ऊर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार मासाळ (रा. कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), नितीन गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, ता. जि. बीड) या आरोपींना अटक आली आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रारदारांकडून गुन्हा दाखल केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजित अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजित मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तपास सुरू केला.ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलिस हवालदार किशोर वीर, पोलिस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला.