

बारामती: बनावट मृत्युपत्राच्या आधारे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी, तसेच या प्रकरणात मृत्युपत्र, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र व इतर बनावट कागदपत्रे तयार करण्यात मदत केल्याच्या प्रकरणात पाच जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवीण त्रिंबकराव जाधव (रा. इंदापूर चौक, बारामती), विजय राजाराम जगताप, मनोज विक्रम आटोळे, श्रीकृष्ण ज्ञानदेव बोरकर व विकास ज्ञानदेव बोरकर (रा. निरावागज, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नीलेश सुभाष शितोळे (रा. शितोळेवस्ती खडकी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली.
शितोळे यांची मयत मामी मनीषा जनार्दन जाधव यांच्या निरावागज येथील गट क्रमांक १५२, १५३, २०४, २०८ व २१२ या जमिनीपोटी हा प्रकार घडला. मनीषा जाधव या ११ ते २२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रकृती गंभीर असल्याने बारामती हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होत्या. त्यांचे बिल नातेवाइकांनी एकत्रितरीत्या जमा करण्यासाठी प्रवीण जाधव याच्याकडे दिले होते. मयत मनीषा यांना कोणतेही अपत्य नव्हते, तसेच सदरील जमीन ही फिर्यादीच्या आईची वडीलोपार्जित होती. प्रवीण जाधव हे फिर्यादीचे जवळचे नातेवाईक नाहीत. परंतु, मनीषा यांच्या मृत्यूनंतर फेरफार नोंदीत अचानक प्रवीण यांचे नाव आले. त्यामुळे फिर्यादीने तलाठी कार्यालय गाठत चौकशी केली. त्या वेळी उपलब्ध दस्ताऐवजात मृत्युपत्र नव्हते. फेरफार नोंद प्रतिज्ञापत्राच्या आधारे केलेली दिसून आले. फेरफारवर मृत्यूची तारीख २२ ऑक्टोबर २०२५, तर मृत्युपत्र केल्याची तारीख १८ डिसेंबर २०२५ दिसली. या त्रुटीवरून पुढे अधिकची चौकशी केली गेली.
मयत मनीषा या बारामती हाॅस्पिटलला दाखल असताना डाॅ. विकास बोरकर यांनी त्यांच्या सावित्री हाॅस्पिटलच्या लेटरहेडवर त्या तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले. या मालमत्तेवर प्रवीण जाधव यांस मुख्य लाभार्थी करण्यात आले. मृत्युपत्रावर मनीषा यांचा अंगठा असल्याचे दाखविण्यात आले, तसेच खोट्या सहीचाही वापर केला गेला. श्रीकृष्ण डी. बोरकर यांच्याकडील नोटरी नोंद दाखविण्यात आली. श्रीकृष्ण व डाॅ. विकास हे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी मिळून खोटी कागदपत्रे बनवल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे. मनीषा या गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये असताना त्यांना मृत्युपत्रात गट क्रमांक, क्षेत्र, इतर मालमत्तेचा अचूक तपशील कसा सांगता आला, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत्युपत्रासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प प्रल्हाद जाधव यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
मृत्युपत्रासाठी मनोज विक्रम आटोळे, विजय जगताप यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत, तसेच त्यांनीही मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती मिळविण्यासाठी अर्ज केल्याचेही नमूद केले आहे. प्रवीण जाधव याने मृत्युपत्रावर आधारित प्रतिज्ञापत्र करून ते खरे असल्याचे भासवत त्याचा वापर केला आहे. त्या आधारे फेरफार नोंद घेतली गेली. सात-बारा उताऱ्यावरही त्याची नोंद झाली, तसेच मयत मनीषा या निरावागजमध्ये राहत असलेल्या वाड्याचा ताबाही घेतला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.