

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : बांधकाम मजूर म्हणून काम करत असलेल्या तरुणीचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. नातेवाइकांनी लग्न लावून देण्याची घाई केली. तीन महिन्यांतच तिला गर्भधारणा झाली आणि तिची एचआयव्ही चाचणीही पॉझिटिव्ह आली. पतीला बोलावल्यावर सुरुवातीला त्याने खूप आरडाओरडा केला. मात्र, समुपदेशकांनी समजावून सांगितल्यावर आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आणि घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. योग्य औषधोपचार आणि समुपदेशनामुळे ते आता सामान्य आयुष्य जगत आहेत. विशेष म्हणजे बाळ एचआयव्ही निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
एचआयव्हीचे निदान होणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी मोठा मानसिक धक्का असतो. आपल्याला हा आजार झाला आहे हे कळल्याने आणि समाज आपल्याला काय म्हणेल या भीतीने बहुतांश रुग्ण नैराश्याच्या गर्तेत जातात. मात्र, नैराश्यावर मात करून वेळेवर एआरटी सेंटरमध्ये जाऊन औषधोपचार सुरू करणे आणि त्याला सकस आहार आणि हलक्या व्यायामाची जोड देणे, यातून एचआयव्हीसह आयुष्य जगता येऊ शकते, असे पुणे एडस नियंत्रण सोसायटीचे समुपदेशक नामदेव धायगुडे यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ससून रुग्णालयातील एचआयव्ही बाधितांवर उपचार करणाऱ्या ‘अँटी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) सेंटरच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षांत 44 हजार 205 एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर उपचार केले. सध्या येथे 5 हजार 683 बाधितांवर उपचार सुरू आहेत. ससूनमध्ये 2002 मध्ये सुरू झालेल्या केंद्रात मोफत ‘एआरटी’ औषधे दिली जातात. येथे समुपदेशन, विविध उपचार, क्षयरोग व कावीळग्रस्त रुग्णांची विशेष काळजी, व्हायरल लोड तपासण्या, मुलांसाठी पोषक आहार, एचआयव्ही संदर्भातील संशोधन अशा सर्व सुविधा मोफत दिल्या जातात, अशी माहिती ससूनमधील एआरटी सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. हरिदास प्रसाद यांनी दिली.
पुणे महापालिकेचे सर्व दवाखाने, प्रसूतीगृहे, रुग्णालयात येणारे रुग्ण, गर्भवती महिला, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी एचआयव्हीविषयी समुपदेशन आणि चाचणी सुविधा उपलब्ध आहे. पुणे महापालिका आणि महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेली एआरटी केंद्रे, गंगाराम कर्णे दवाखाना येथे मोफत एआरटी औषधोपचार सुविधा सुरू आहे.
डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
एचआयव्ही संशयित रुग्णांची रॅपिड किटच्या सहाय्याने चाचणी केली जाते. एक ते दोन तासात अहवाल येतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ‘कर्न्फमेशन टेस्ट’साठी राज्य शासनाच्या ‘इंटिग््रेाटेड काउन्सलिंग अँड टेस्टिंग सेंटर’मध्ये पाठवले जाते. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आधी समुपदेशन केले जाते. रुग्णांची पार्श्वभूमी जाणून घेतली जाते आणि गुप्तता पाळण्याबाबत त्यांना आश्वस्त केले जाते. त्यानंतर औषधोपचार आणि समुपदेशन नियमितपणे सुरू ठेवले जाते.
नामदेव धायगुडे, समुपदेशन, पुणे एडस नियंत्रण सोसायटी.
ससूनमधील एआरटी सेंटरमध्ये पुणे शहरातील 11 उपकेंद्रांचा समावेश आहे. रुग्णांबाबत कमालीची गुप्तता पाळून त्यांचे समुपदेशन करणे आणि औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे, याबाबत केंद्रात काळजी घेतली जाते. वेळेत चाचणी करून निदान आणि लवकर उपचार सुरू केल्याने संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते.
डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार