

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे. बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल अकरा वाजेपर्यंत सुरु होती.
या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे. बँकेने मात्र याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारीच बारामतीत सत्तेच्या गैरवापराची भीती व्यक्त केली होती. त्याचं रात्री हा प्रकार घडला आहे. (Latest Pune News)
बारामती शहरातील आमराई येथील जिल्हा बॅंकेची मुख्य शाखा बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. ही माहिती मिळाल्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. यावेळी रंजनकुमार तावरे यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मिळून आल्याचं सांगत या बॅंकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
तावरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. पवार यांचे पीए हे आमच्या समोरून गाडीतून गेले. अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं..? असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचं काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही करत आहोत. सभासद, त्याचे नातेवाईक आणि यामागे जबाबदार व्यक्तींची नावं अशी यादीच या ठिकाणी मिळून आली आहे.
अशा पद्धतीने याद्या तयार करण्यामागचे गौडबंगाल नेमके काय असा प्रश्न तावरे यांनी उपस्थित केला. या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं तावरे यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा पोलिस घटनास्थळी आले होते. सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या या आरोपांमुळे बारामतीतील राजकारण अधिकच तापले असून जिल्हा बँकेभोवती संशयाचे वलय तयार झाले आहे. या प्रकरणावर आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच काहीही होऊ द्या, मी ही निवडणूक हलक्यात घेणार नाही असे सांगितले होते. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला असून त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व सहकारी संस्था च्या अधिकारी पदाधिकारी, संचालकांना जबाबदारीच निश्चित करुन देण्यात आली आहे.