

डोंबिवली : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला बुधवारी पहाटे सायकलने वारी निघाली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला... असा विठ्ठलाचा गजर करत निघालेल्या दिंडीमध्ये अबाल-वृद्धांसह महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील गणपती मंदिरापासून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.
या दिंडीमध्ये 50 महिलांसह पुरुष आणि मुलांनी सहभाग घेतला. ही वारी 22 जूनपर्यंत पंढरपुरात वास्तव्य करणार आहे. तेथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन येणार्या वारकर्यांची सेवा करणार आहेत. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन आणि देवदर्शन असे या सायकलदिंडीचे उद्देश आहेत.
बहुसंख्य महिलांनही या दिंडीत सहभाग घेतला. या सायकलवारीत 15 वर्षांच्या मुलांपासून 78 वर्षांच्या महिला व पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व सायकलस्वार 22 जूनला रात्री डोंबिवलीत परतणार आहेत. हे सर्वजण वारीच्या वाटेवर, तसेच पंढरपुरात वास्तव्याला येणार्या वारकर्यांची सेवा आणि त्यांना मदत करणार आहेत. सायकलस्वारांसोबत बस, टेम्पो आणि रुग्णवाहिका राहणार आहे.
पाण्याच्या बॉटल, औषधे, खाण्याचे पदार्थ, आदी वस्तूंचा उपयोग वारकर्यांसाठी केला जाणार आहे. या वारीसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत देखील दिली आहे. बुधवारी पहाटे वारीला निघण्यापूर्वी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मदत देऊन शुभेच्छा दिल्या.