

राजेंद्र गलांडे
बारामती: देशात बारामतीला वेगळ्या उंचीवर नेण्याचे स्वप्न बघत ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करीत बारामतीकरांनी दादांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्ताने आता बारामतीसह राज्यात ‘सुनेत्रापर्र्व’ला दमदार सुरुवात झाली आहे.
दि. 28 जानेवारी रोजी बारामतीत अजितदादा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अवघा देश हळहळला. बारामतीकर तर अद्यापही त्या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. त्यात लागलीच तीन महिन्यांत पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले. त्यामुळे ही केवळ पोटनिवडणूक नव्हे, तर ती भावनांची, आठवणींची आणि नात्यांची परीक्षा होती. अजितदादांनी बारामतीकरांसाठी उभी हयात अर्पण केली. त्यांनी विकासकामांचा डोंगर बारामतीत उभा केला. त्यांच्या जाण्याचे अतीव दुःख उराशी बाळगत बारामतीकर मतदानाला बाहेर पडले.
तुल्यबळ उमेदवार नसणे आणि उन्हाचा तडाखा, यामुळे अपेक्षित मतदान झाले नसतानाही सुनेत्रा पवार यांनी देशात मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. बारामतीकरांसाठी ही निवडणूक कर्तव्य पार पाडण्याची होती. त्यांनी ते चोखपणे पार पाडले. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना मोठा विजय संपादन करता आला. सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते हे केवळ आकडे नाहीत, तर त्या मतामागे अजितदादांप्रती असलेली निष्ठा व प्रेम दिसून आले. त्यांचे पुत्र पार्थ व जय यांच्या राजकीय भवितव्यासाठीसुद्धा ही निवडणूक महत्त्वाची ठरली. दुःखद प्रसंगात ही निवडणूक झालेली असली तरी बारामतीकरांनी अजितदादांवरील प्रेम मतातून व्यक्त करताना सुनेत्रा पवार यांच्यावरही विश्वास दाखविला.
महायुतीने या पोटनिवडणुकीत मोठी ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी बारामतीत आले होते. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री तसेच भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनीही बारामतीत प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ व जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनीही प्रचारात सहभागी होत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीत नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय. घुटुकडे हे सोलापूरचे उमेदवार, हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार वगळता अन्य 20 अपक्ष निवडणुकीत उभे होते.
त्यात बारामतीतील आठ जणांचा समावेश होता. या 22 जणांना मिळून पाच हजार मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे व ‘बिग बॉस’फेम अभिजित बिचुकले यांचा समावेश होता. बाहेरील उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चर्चेत आली होती. निवडणूक बिनविरोध झाली नाही; पण बारामतीकरांनी बाहेरच्या उमेदवारांना अजिबात साथ न देता विकासाच्या मागे आपली ताकद उभी केली. एकीकडे 2029चा उमेदवार कोण? यावरून मतदानादिवशी पवार कुटुंबातच सुंदोपसुंदी सुरू झाली असताना बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवत नवा विक्रम प्रस्थापित केला.