

पुणे: बाणेर येथील पॅनकार्ड क्लबरोड परिसरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर बाणेर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी तेथून सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. फॉर्च्युन स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा हा प्रकार सुरू होता.
याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक शैला पाथरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाणेर पोलिस ठाण्यात स्पा मॅनेजर सुशील त्रिलोक ठाकूर (वय 26, रा. बाणेर, मूळ हिमाचल प्रदेश), दीपक बिजेंद्र सिंह (वय 31, रा. दिल्ली), स्पा मालक ऋषभ राजेंद्र पाटील (वय 30, रा. जळगाव), जागामालक जयेश सुनील अतमानी (वय 29, रा. पिंपळे सौदागर) या चौघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर येथील ॲक्सिस बँकेच्या वरती असलेल्या ओंकार पॅराडाईज या इमारतीत फॉर्च्युन स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग््रााहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले.
त्यानुसार बाणेर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास छापा टाकून, पाच पीडित महिलांची सुटका केली. आरोपी स्पा मॅनेजर ठाकूर आणि सिंह हे दोघे त्या महिलांंना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते.
त्यातून मिळालेल्या पैशांतून स्वतःची उपजीविका भागवित होतेख, तर जागामालक जयेश अतमानी याने त्याच्या मालकीची जागा आरोपींना स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यास खुली करून दिली.
तसेच ही जागा भाड्याने देताना, निर्धारित नियमानुसार, भाडेकरूंची कोणत्याही प्रकारची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, पोलिस निरीक्षक सावंत, गुन्हे निरीक्षक अलका सरग यांनी केली.
घरातच सुरू होता कुंटणखाना
राहत्या घरामध्ये पश्चिम बंगाल येथील दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मनीषा रघुनाथ साळुंखे (वय 40, रा. संतोषनगर, कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिला सहायक फौजदार छाया जाधव यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली आहे.
संतोषनगर कात्रज येथील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून दोन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका पोलिसांनी केली.
या दोन महिलांना घरकाम मिळवून देण्याच्या आमिषाने पुण्यात आणण्यात आले होते. मात्र आरोपी महिला साळुंखे हिने त्यांना फसवून त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या पैशातून ती आपली उपजीविका भागवित असल्याचे समोर आले आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली. या वेळी सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, याबाबत स्पा मॅनेजर, मालक आणि जागामालक अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे