

Kondhwa vehicle vandalism
पुणे: कोंढव्यातील लक्ष्मीनगर आणि अश्रफनगर येथे तब्बल 21 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 6 जणांच्या टोळक्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 22 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी लक्ष्मीनगर येथील त्याच्या घरासमोर लावली असताना 16 एप्रिलला पहाटे साडेचारच्या सुमारास घराच्या बाहेर मोठ्याने काचा फोडल्यासारखा आवाज आला.
त्यामुळे ते घराच्या खिडकीजवळ आले असता पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले होते. त्यांच्या हातात विविध हत्यारे होती अन् त्या हत्यारांच्या साह्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून ते वाहने तोडफोड करत होती. शिवीगाळ करत टोळके लोकांना धमकवत होते. तसेच कोणी मध्ये आल्यास खल्लास करण्याबाबत ते बोलून दहशत पसरावत होते.
या हत्यारधार्यांमुळे कोणीही नागरिक घराबाहेर आले नाही. नंतर हे टोळके आठ दुचाकी फोडून भगवा चौकाच्या दिशेने गेले. तेथे त्यांनी प्रतिभाताई शाळेजवळ अश्रफनगर येथील गल्ली नंबर 7 येथे पार्क केलेल्या तब्बल 13 चारचाकी-तीनचाकी गाड्या फोडून त्याचे नुकसान केले.
याप्रकरणी पाच ते सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोडफोडीच्या प्रकारानंतर कोंढव्यातील स्थानिक नागरिकांनी याबाबत एकत्र येऊन कोंढवा पोलिसांना निवेदन देऊन आरोपींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.