baby born at Pune railway station
प्रसाद जगताप
पुणे: पुणे रेल्वे स्टेशनवरील 9 जुलैची रात्र. साधारण 11 वाजता प्लॅटफॉर्म 1 वर थांबलेल्या एका 29 वर्षीय गर्भवती प्रवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. याबाबतची माहिती कळताच आरपीएफच्या महिला हेडकॉन्स्टेबल शिल्पा उकाडे यांनी प्लॅटफॉर्मवर तत्काळ धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उकाडे यांनी आरपीएफ, जीआरपीएफ कर्मचार्यांच्या साथीने आडोसा निर्माण करत महिलेस धीर दिला अन् डॉक्टर येण्यापूर्वीच एका नव्या जीवाचे सुखरूप आगमन झाले. संकटाचा क्षण ठरणार्या या प्रसंगाचे रूपांतर आनंदाच्या क्षणात झाले अन् दोघांना नवजीवन मिळाले. (Latest Pune News)
रात्री साधारण 11 वाजता, पुणे रेल्वे स्थानकावरील उपस्थानक अधीक्षकांनी आरपीएफ पोलिस ठाण्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका महिलेलाप्रसूतीवेदना होत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तत्काळ, महिला हेडकॉन्स्टेबल शिल्पा उकाडे प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या.
त्या वेळी उकाडे यांना प्लॅटफॉर्म क्रमांक1 वर राजावती कोल (वय 29) ही गर्भवती महिला असह्य वेदनेने विव्हळताना दिसली. राजावतीसोबत तिचे पती रणजित कोलही उपस्थित होते. कोल दाम्पत्य हे पुण्याहून दानापूर (विहार) येथे जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते.
आमच्या कर्मचारी शिल्पा उकाडे यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. पुणे रेल्वेस्थानकावरील ही हृदयस्पर्शी घटना कर्मचार्यांच्या समर्पण आणि करुणेचे सुंदर उदाहरण आहे. ते गरजूंना मदत करण्यासाठी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य करतात. ही घटना एका नवीन जीवाच्या प्रवासाची सुरुवात आहे, आरपीएफ आणि इतर कर्मचार्यांच्या सहकार्यामुळे ती शक्य झाली.
- सुनील यादव, आरपीएफ निरीक्षक, पुणे रेल्वेस्थानक