

पुणे: मांजरी परिसरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घरच्यांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याच्या कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
शुक्रवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघांचे मृतदेह खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्र परिसरातील झाडीत मिळून आले. तेथेच विषारी औषधाची रिकामी बाटली होती. दोघांनी गुरुवारीच आत्महत्या केली असावी. याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी वानवडीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. गुरुवारी क्लास सुटल्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या बहिणीने शोधाशोध करून रात्री दहा वाजता वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मुलीच्या नातेवाइकांकडे तपास केला असता सुरुवातीला त्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा त्यांनी एका तरुणाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तरुणाची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता त्याचा मोबाईल बंद लागला. गुरुवारी साडेपाच वाजता त्याचा मोबाईल बंद झाला होता.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्राच्या परिसरातील झाडीत दोन मृतदेह आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. त्यांनी तत्काळ उत्तमनगर पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उत्तमनगर पोलिसांनी दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले असता त्यातील एक मृतदेह वानवडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्यासोबत आत्महत्या करणार्या तरुणाची देखील ओळख पटवली. घटनास्थळी पोलिसांना दोघांनी प्राशन केलेल्या विषारी औषधाची बाटली मिळून आली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आले होते.
याबाबत बोलताना वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी सांगितले, पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीचे एका 23 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. त्यातून दोघांनी आत्महत्या केली असावी. तरुणाच्या कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली आहे. तरुण खासगी नोकरी करीत होता. पुढील तपास सुरू आहे.