‘अवकाळी’चीही यंदा अवकृपाच; शहरात दशकातील नीचांकी पाऊस

‘अवकाळी’चीही यंदा अवकृपाच; शहरात दशकातील नीचांकी पाऊस
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे : शहरात दशकातील यंदा सर्वांत कमी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्याला सामोरे जावे लागले. मार्च ते मे 2022 या कालावधीत तब्बल 69 टक्के पाऊस कमी झाल्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी शहरात वर्षभर पाऊस पडत होता. त्यामुळे वर्षाच्या शेवटी ती सरासरी 750 मिमीवर पोहोचली.

यात अवकाळी पावसाचा वाटा 35 ते 40 टक्के होता. मात्र, यंदा मार्च, एप्रिल व मेमध्ये उणे 69 टक्के पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. 15 मार्चपासून शहरात उष्णतेची लाट सुरू झाली. त्यानंतर 24 ते 31 मार्च व त्यापुढे 14 एप्रिलपर्यंत ही लाट होती. पुढे अवकाळी पाऊस पडेल, असे वाटत असताना शहरात एक थेंबही पाऊस झाला नाही. मार्च व एप्रिल हे दोन्ही महिने कोरडे गेले.

दशकातील सर्वांत कमी पावसाचा उन्हाळा

मार्च ते मे या कडक उन्हातील महिन्यांत शहराच्या पावसाच्या अभ्यास केला असता असे लक्षात आले की, हवामान विभागाने ठेवलेल्या नोंदीनुसार मार्चमध्ये शहरात सरासरी 20 मिमी पाऊस पडतो. तो यंदा 8 मिमी पडला. एप्रिलमध्ये 8.1 मिमी पडतो, तो 1.2 मिमी पडला, तर मे महिन्यात सरासरी 29.2 मिमी पाऊस पडतो, तो 24 मेपर्यंत अवघा 2.5 ते 3 मिमी पाऊस पडला. गेल्या दशकातील सर्वांत कमी पावसाचा उन्हाळा म्हणून 2022 च्या उन्हाळ्याची नोंद हवामान विभागाने घेतली.

चाळीस वर्षांतला चौथा कडक उन्हाळा

हवामान विभागाची आकडेवारी तपासली असता असे लक्षात येते की, सन 2012, सन 2017, सन 2018 आणि 2022 च्या उन्हाळ्यात खूप कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र, यात सर्वांत कमी पाऊस 2022 च्या उन्हाळ्यात पडल्याने हा उन्हाळा पुणेकरांना जड जात आहे. आता मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण आहे. शहराचे तापमानही 6 अंशांनी घटले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा कडक उन्हाने पुणेकरांना हैराण केले. पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला तरी पाऊस पडला नाही.

शहरात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही जास्त

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, 'पुणे शहरात प्रदूषणही खूप वाढले आहे. शहरात वाहनांच्या धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण शहरात खूप वाढल्याने त्याचाही परिणाम पर्जन्यमानावर झाला आहे. यंदाचा उन्हाळा कडक असण्याचे ते एक कारण आहे. तसेच शहरात हवेचे दाब जास्त असल्याने पुण्याकडे बाष्पयुक्त वारे येण्यास वेळ लागत आहे. सध्या हवेचे दाब 1008 हेक्टा पास्कल इतका आहे. पाऊस पडण्यासाठी तो दाब 1004 ते 1002 हवा असतो. कर्नाटकात सध्या हवेचे दाब 850 पास्कल असल्याने तेथे पाऊस पडतोय.'

हवेचे दाब शहरासाठी अनुकूल नव्हते. त्यामुळे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात पाऊस खूप कमी झाला. मात्र, विदर्भ-मराठवाड्यात हवेचे दाब त्या तुलनेत कमी झाल्याने पुणे शहराच्या तुलनेत तिकडे अवकाळी पाऊस जास्त झाला. पुणे शहरात हवेचे दाब जास्त असल्याने बाष्पयुक्त वारे आले नाहीत. मात्र, मान्सून येताच हे वातावरण बदलून जाईल.

-डॉ. डी. एस. पै, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग, केरळ

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news