भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महिन्यातील पहिल्याच सोमवारी दोन लाख भक्त-भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे पहाटे
4.30 ला महापूजा व आरती झाल्यानंतर दर्शन घेतले. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. सोमवारी नागपंचमीनिमित्त मंदिर व गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तर नागाची व महादेवांची फुलांची प्रतिकृती सजविण्यात आली होती. भरपावसात, दाट धुके, बोचर्या थंडीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते.
मंदिर परिसरात मुखदर्शन रांग आणि पास सुविधामुळे दर्शन सुलभ झाले. 'जंगलवस्ती भीमाशंकर की जय व भीमाशंंकर महाराज की जय' घोषाने परिसर दुुुमदुमला होता. शनिवारी, रविवारी व सोमवारीही पवित्र शिवलिंग दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. कोकणातून कर्जत ते खांडजमार्गे गणपती घाटाने पायी भाविकांचा मोठा ओघ सुरू आहे. श्रावणातील गर्दी लक्षात घेऊन दुपारी 12 नंतर अभिषेक व 'व्हीआयपी' आणि दर्शन पास बंद करण्यात आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. अमरनाथ सेवा मंडळाकडून दोन ठिकाणी मोफत फराळवाटप करण्यात आले.
भाविकांना मंदिर परिसरामध्ये व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त मधुुुकर गवांदे, दत्तात्रय कोडिलकर, रत्नाकर कोडिलकर, गोरक्षनाथ कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, एस.टी.महामंडळाचे विभागीय निरीक्षक गोविंद जाधव, मारुती खळदकर प्रयत्न करत होते. उपजिल्हाधिकारी सारंग कोडलकर यांनी पहिल्याच श्रावण सोमवारी जल आभिषेक करून दर्शन घेतले. वाहनतळ 2,3, 4 व 5 ते मंदिर परिसरात संततधार पावसात यात्रा काळात प्रशासन व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा